वरुण धवन पंजाबमध्ये करतोय काय?

तरुणाईचा लाडका अभिनेता वरुण धवन सध्या पंजाब मुक्कामी आहे. आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी पंजाबला गेलेल्या वरुणने अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली. त्याचीच ही झलक...

वरुणने नुकतंच अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात जाऊन डोकं टेकलं. त्याच्या जोडीला निर्माते भूषण कुमार, कोरिओग्राफर-दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि लिझेल डिसूझाही असल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळतं. पंजाब पोलिसांसोबतच खासगी सुरक्षारक्षकांच्या गराड्यात वरुणने सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तिथल्या नयनरम्य वातावरणात फोटो काढण्याचा मोह त्याला आवरता आला नाही.

रेमो डिसूझाचं दिग्दर्शन

खरं तर वरुण सध्या एका आगामी सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने पंजाबमध्ये आहे. भूषण कुमार निर्मित आणि रेमो डिसूझा दिग्दर्शित या सिनेमाचं शीर्षक अद्याप ठरलेलं नाही. रेमोच्या दिग्दर्शनाखाली बनणारा हा सिनमाही डान्स म्युझिकल असल्याचं सांगितलं जात आहे. या सिनेमातील सात दिवसांचं चित्रीकरणाचं शेड्यूल पंजाबमध्ये सुरू आहे.

१२ गाणी!

सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर आमच्या टिमला पॅाझिटीव्ह एनर्जी मिळाल्याचं मत भूषण कुमार यांनी व्यक्त केलं आहे. शूटिंगसाठी आता नवा जोश आला आहे. आमच्या या महत्वपूर्ण सिनेमात डान्स आणि म्युझिकला खूप वाव आहे. सचिन-जिगर ही संगीतकार जोडी या सिनेमासाठी १२ गाण्यांवर काम करत असून यात मूळ गाण्यांसह लोकसंगीत आणि रिक्रेएटेड गाण्यांचाही समावेश असल्याचं भूषण कुमार यांचं म्हणणं आहे.

लंडनमध्येही शूटिंग

पंजाबमध्ये सध्या या चित्रपटातील एका वेडींग साँगचं चित्रीकरण सुरू आहे. याखेरीज सिनेमातील वरुण आणि त्याच्या कुटुंबातील काही इमोशनल सीन्सही येथे चित्रीत होणार आहेत. पंजाबमधील शूटिंग आटोपल्यानंतर ही टीम लंडनच्या दिशेने उड्डाण करणार आहे. तिथे ४० दिवसांच्या शूटिंग शेड्यूलची योजना आहे, जे १० फेब्रुवारीला सुरू होणार आहे.

शीर्षक लवकरच ठरणार

८ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात आलेल्या या सिनेमाचं शीर्षक लवकरच ठरवण्यात येणार असल्याचं समजतं. या सिनेमात पुन्हा एकदा वरुणसोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. सध्या ती रेमोच्या टीमकडून वेगवेगळ्या प्रकारच्या डान्सचे धडे घेण्यात व्यग्र आहे. ती थेट लंडनमध्ये या सिनेमाच्या टिममध्ये सामील होणार असल्याची माहिती मिळाली आहे.


हेही वाचा

हिंदी प्रेक्षकांसोबत लक्ष्मण खेळणार 'लुका छिपी'!

दक्षिणात्य भाषेत बनणार 'उरी'चा रीमेक!

पुढील बातमी
इतर बातम्या