एअर इंडियाच्या मुंबईतील ३० फ्लॅटचा पुन्हा लिलाव

एअर इंडियानं आपल्या मुंबईतील ३० फ्लॅटचा पुन्हा लिलाव (आॅक्शन) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वांद्रे, कफ परेड, प्रभादेवी, खार आणि मालाड येथील २५० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असून यासाठी एअर इंडियानं नुकत्याच आॅनलाईन निविदा काढल्या आहेत. त्यानुसार डिसेंबरमध्ये लिलाव पार पडणार आहे. 

याअाधी लिलाव अयशस्वी

विमान वाहतूक सेवेतील एकेकाळच्या आघाडीच्या अशा एअर इंडियाच्या डोक्यावर मोठं कर्ज अाहे. त्यामुळे एअर इंडिया आर्थिक संकटात आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एअर इंडियानं मुंबईसह देशभरातील मालमत्ता विकून त्यातून उत्पन्न मिळवत कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला खरा. पण यात तिला यश येताना दिसत नाही. कारण याआधीही एअर इंडियानं मुंबईतील ३० फ्लॅटच्या लिलावाची प्रक्रिया राबवली. पण या प्रक्रियेला शून्य प्रतिसाद मिळाला नि मालमत्ता विकली गेली नाही.

१४ फ्लॅट २०० कोटींना 

आता पुन्हा एअर इंडियानं मुंबईतील ३० फ्लॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. पाली हिल, वांद्रे येथील इमारतीत एअर इंडियाचे १४ फ्लॅट असून या फ्लॅटची आधारभूत किंमत २०० कोटी रुपये आहे. तर नवविद्या लक्ष्मी, माहिम येथील फ्लॅटची किंमत ३.१२ कोटी रुपये इतकी आहे. खार येथील तीन फ्लॅटचाही  लिलावात समावेश असून यातील ३ बीएचकेच्या एका फ्लॅटची आधारभूत किंमत ५.१५ कोटी रुपये आहे. तर २ बीएचकेच्या दुसऱ्या फ्लॅटची आधारभूत किंमत ४.२८ कोटी रुपये आणि २ बीएचकेच्या आणखी एका फ्लॅटची आधारभूत किंमत  ४.८८ कोटी रुपये अाहे. 

प्रतिसाद मिळणार?

कफ परेडमधील वेनिस अपार्टमेन्टमधील 3 बीएचकेच्या फ्लॅटची आधारभूत किंमत एअर इंडियानं ७.३२ कोटी रुपये इतकी ठेवली आहे. तर मालाडमधील ९ फ्लॅटची विक्री ८९ लाखांत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी वांद्रयातील एका फ्लॅटची आधारभूत किंमत १०.३६ कोटी रुपये तर प्रभादेवीतील फ्लॅटची किंमत  ७ कोटी रुपये इतकी ठेवली अाहे. या फ्लॅटच्या लिलावाला आता तरी प्रतिसाद मिळतो का आणि एअर इंडियाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर थोडा तरी हलका होतो का हे आता डिसेंबरमध्येच समजेल.


हेही वाचा-

गौतम सिंघानियांचा रेमंड अॅपेल्सच्या चेअरमनपदाचा राजीनामा

७५ रुपयांचं नवं नाणं लवकरच


पुढील बातमी
इतर बातम्या