जेट एअरवेज घेणार पुन्हा भरारी

आर्थिक संकटामुळे बंद पडलेली विमान कंपनी जेट एअरवेज आता पुन्हा सुरू होणार आहे. जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात जेट एअरवेजची विमाने पुन्हा उड्डाण घेणार आहेत

'जेट २.०' या नव्या नावासह जेट एअरवेज सुरू होणार आहे. कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी गुंतवणूकदारांच्या समूहाने कृती आराखडा तयार केला आहे. या समूहाचे नेतृत्व कालरॉक कॅपिटल आणि उद्योजक मुरारी लाल जालान यांच्याकडून करण्यात येत आहे. या समूहाकडून मंगळवारी एक निवेदन जारी करण्यात आलं. जेट एअरवेज उन्हाळी सुट्ट्यांमध्ये हवाई सेवा पुन्हा सुरु करेल असं या निवेदनात सांगण्यात आलं आहे.

तब्बल नऊ हजार कोटी रुपयांच्या तोट्यामुळे जेट एअरवेजचं कामकाज मागील वर्षी एप्रिल महिन्यात ठप्प झालं. यामुळे कंपनीतील १६ हजार कर्मचारी बेरोजगार झाले. जेट २.० चे मुंबई, दिल्ली, बंगळुरू या शहरांवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरातील शहरांमध्ये हवाई सेवेचा विस्तार केला जाणार  आहे. 

मुरारी लाल जालान यांची उझबेकिस्तान व यूएईमध्ये गुंतवणूक आहे. त्यांनी लंडनच्या कालरॉक कॅपिटल या गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या साहाय्याने जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवनाची तयारी त्यांनी दोन ते तीन महिन्यांपूर्वी सुरू केली होती. 


हेही वाचा -

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, परिस्थितीही नियंत्रणात

कांदिवलीत बारवर कारवाई, आॅर्केस्ट्राच्या नावाखाली महिलांकडून अश्लील कृत्य


पुढील बातमी
इतर बातम्या