झोमॅटोवर फूड ऑर्डर केल्यानंतर आता त्याची डिलिव्हरी फक्त १० मिनिटांतच दिली जाणार आहे. झोमॅटोचे सहसंस्थापक दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी ट्विटररवरून याबाबतची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी यावरून टीका केली आहे.
रोहित यांनी ट्विट केलं की, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं बहुधा गरीब कुटुंबातील असतात. १० मिनिटांत फूड डिलिव्हरी देण्याची झोमॅटोची ही योजना म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीनं या मुलांचा विमा उतरवणं गरजेचं आहे.
देशात १० मिनिटांत किराणा सामनाची डिलिव्हरी देणारं अॅप सुरू झालं आहे. त्यानंतर आता फूड ऑर्डरही १० मिनिटांत मिळणार आहे. झोमॅटोच्या या १० मिनिटांत फूड डिलिव्हरीची सुरुवात गुरुग्राममधून होणार असल्याचं दीपिंदर गोयल यांनी म्हटलं आहे.
झोमॅटोचा पाठिंबा असणाऱ्या ब्लिंकिटबद्दल (Blinkit) (आधीचे ग्रोफर्स- Grofers) गेल्या वर्षी भरपूर तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता गोयल यांनी ही घोषणा केली आहे.
मात्र वेळेची मर्यादा असली तरी डिलिव्हरी एजंट्सच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
“लवकर डिलिव्हरी देण्यासाठी आम्ही डिलिव्हरी करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही किंवा डिलिव्हरी द्यायला उशीर झाला तर त्यांना दंडही करणार नाही. वेळेची घाई असली तरी ती कोणाच्याही जीवाच्या बदल्यात नसेल,” असं गोयल यांनी म्हटलं आहे.
जास्त मागणी असलेल्या ग्राहक परिसरातच ही जलद डिलिव्हरी सेवा उपलब्ध असेल. या परिसरातच हे फिनिशिंग काउंटर्स (Finishing Counters) उभारले जातील.
साधारणपणे कोणत्या पदार्थांना जास्त मागणी आहे त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे सुविधा सुरू करण्यात येईल.
जेव्हा अन्न डिलिव्हरी पार्टनरकडून पिक-अप केलं जाईल तेव्हा ते निर्जंतुक केलेलं आणि गरम असेल याची खात्री केली जाईल असंही झोमॅटोकडून (Zomato) स्पष्ट करण्यात आलं आहे.
लवकरात लवकर डिलीव्हरी देणारं रेस्टॉरंट कोणतं हे झोमॅटोवर सगळ्यांत जास्त वापरलं जाणारं फीचर आहे. त्यावर आधारितच ही इन्स्टंट फूड डिलिव्हरी सुरू करण्यात आल्याचं गोयल यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा