मुंबईत पेट्रोल दरवाढीचा भडका! ५५ महिन्यांतील सर्वोच्च दर

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • व्यवसाय

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचाही भडका उडत आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला या दरवाढीचे चांगलेच चटके बसू लागले आहेत.

शुक्रवारी पेट्रोलच्या दरांमध्ये प्रति लिटर १ पैसे आणि डिझेलच्या दरांत प्रति लिटर ४ पैसे अशी नाममात्र वाढ झाली असली, तरी पेट्रोल-डिझेलचे दर ५५ महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. सप्टेंबर २०१३ नंतरची ही सर्वाधिक दरवाढ आहे.

मुंबईत किती दर?

इंडियन ऑईलच्या वेबसाईवर दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर ८१ रुपये ९३ पैसे आणि डिझेल ६९ रुपये ५४ पैशांवर गेले आहे. तर दिल्लीत पेट्रोल ७४.०८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ६५.३१ रुपयांवर गेले आहे.

दरवाढीमागचं कारण काय?

पेट्रोलियम उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'ने कच्च्या तेला (क्रूड आॅइल)चं उत्पादन घटवल्याने कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. त्यातच 'ओपेक' आणि 'नाॅन ओपेक' देशांनी कच्च्या तेलाचं उत्पादन कमीच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने किंमती आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

त्यानुसार पुढच्या २ महिन्यांत कच्चे तेल प्रति बॅरल ८५ डाॅलरवर पोहोचू शकते असा अंदाज आहे. सोबतच अमेरिकेने इराणवर काही निर्बंध लादले, तर पुरवठा आणखी घटवण्याचे संकेतही 'ओपेक'ने दिले आहे. तसं झाल्यास जागतिक बाजारपेठेत तेलाच्या दरवाढीचा नक्की भडका उडू शकेल.

भारतात काय स्थिती?

सध्या इंडियन बास्केटमध्ये क्रूड आॅइलचे दर ७.१२ डाॅलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. हे तीन वर्षांतील सर्वोच्च दर आहेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात देशाचा क्रूड आॅइल आयातीचा खर्च २५ टक्क्यांनी वाढून ८७.७ अब्ज डाॅलरवर पोहोचला आहे. २०१६-१७ मध्ये भारताने २१.९३ कोटी टन क्रूड आॅइल आयात केलं होतं. त्यावर ७०.१९६ अब्ज डाॅलर म्हणजेच ४.७ लाख कोटी खर्च करण्यात आले होते.

महागाई वाढण्याची चिन्हे

आर्थिक वर्ष २०१९ मध्ये क्रूड आॅइलचे दर १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणानुसार दर १० डाॅलर दरवाढीमागे देशाची जीडीपी ०.३ टक्क्यांनी घसरून महागाई दर १.७ टक्के वाढू शकतो.

आरबीआयच्या अंदाजानुसार २०१८-१९ मध्ये पुढील ६ महिन्यांमध्ये महागाई दर ५ टक्क्यांच्या वर जाऊ शकतो.


हेही वाचा-

कर वाचवण्याच्या नादात जाल तुरूंगात!

एटीएममधून पैसे काढणं अजून महाग होणार?


पुढील बातमी
इतर बातम्या