सलग दहाव्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव!

  • मुंबई लाइव्ह टीम & नितेश दूबे
  • व्यवसाय

एकीकडे आधीच वाढलेल्या महागाईचा सामना करणाऱ्या सामान्यजनांचं आता पेट्रोल डिझेलच्या भाववाढीमुळे पुरतं कंबरडं मोडलं आहे. गेल्या १० दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वारंवार वाढणाऱ्या दरांमुळे सामान्यांचं गणित पुरतं बिघडलं आहे.

मुंबईत ८५ रूपये झाले पेट्रोल

गेल्या १० दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये २.५१ रूपयांपासून २.६८ रूपये प्रति लिटरपर्यंत वाढ झाली आहे. त्याच वेळेत डिझेलच्या दरांमध्ये २.२६ रूपयांपासून २.५८ रूपयांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईचा विचार करता सध्या पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८४ रूपये ९९ पैशांपर्यंत पोहोचला आहे.

सारे काही निवडणुकांसाठीच?

गेल्या सुमारे महिन्याभरापासून कर्नाटक विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यात आल्याचा दावा काही जाणकारांकडून केला जात आहे. कारण या निवडणुकांसाठी १४ मे रोजी मतदान घेण्यात आले. आणि मतदान झाल्यापासूनच तेल कंपन्यांनी दर वाढवण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी या कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार पेट्रोलच्या किंमतींमध्ये १७ पैशांची तर डिझेलच्या किंमतींमध्ये ३० पैशांची वाढ झाली आहे.

१० दिवसांत झाला सगळा खेळ!

मुंबईमध्ये डिझेलच्या किंमती गेल्या १० दिवसांमध्ये २ रुपये ५६ पैशांनी वाढल्या आहेत. दरवाढीनंतर आता मुंबईकरांना प्रतिलिटर डिझेलसाठी ७२ रूपये ७६ पैसे मोजावे लागणार आहेत.


हेही वाचा

मुंबईत पेट्रोल नव्वदी गाठणार?

पुढील बातमी
इतर बातम्या