मुंबईत पेट्रोल पुन्हा भडकलं, सामान्यांचं कंबरडं मोडलं!

कर्नाटक निवडणुकांसाठीच वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती भाजपा सरकारने नियंत्रणात ठेवल्या असल्याच्या चर्चा निवडणुकांदरम्यान सुरू होत्या. आता त्या चर्चा खर्या असल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरून तरी हेच स्पष्ट होत आहे.

SHARE

कर्नाटक निवडणुकांसाठीच वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती भाजपा सरकारने नियंत्रणात ठेवल्या असल्याच्या चर्चा निवडणुकांदरम्यान सुरू होत्या. आता त्या चर्चा खर्या असल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरून तरी हेच स्पष्ट होत आहे.


सामान्यांचं आर्थिक गणित बिघडलं!

सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये रेकॉर्ड ब्रेक दरवाढ झाल्यानंतर पुढच्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या. त्यामुळे सामान्य मुंबईकरांसोबतच समस्त देशवासियांचं आर्थिक गणित बिघडलंय. देशातल्या विविध राज्यांमध्ये मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सरासरी ३४ पैशांएवढी वाढ नोंदवण्यात आली.


निवडणुकांमुळे किंमती होत्या स्थिर?

कर्नाटक निवडणूक प्रक्रियेदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जवळपास स्थिर राखण्यात आल्या होत्या. मात्र, काँग्रेस-जेडीएसचं सरकार कर्नाटकमध्ये येणार हे निश्चित होताच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे राजकीय आणि व्यावसायिक जाणकारांच्या मते ही वाढ थोपवून धरलेली असल्याचं समोर येत आहे.


सलग दोन दिवस वाढले दर

मंगळवारी देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा दर हा प्रति लिटर ८४.७० रूपयांपर्यंत पोहोचला होता. त्याचवेळी डिझेल ७२.४८ रूपये प्रतिलिटर या दराने विकले जात होते. सोमवारी हेच दर अनुक्रमे ८४.३६ आणि ७२.१७ रूपये प्रतिलिटर इतके होते. मुंबईमध्ये पेट्रोल ३४ पैशांनी तर डिझेल ३१ पैशांनी महागलं आहे.


कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम?

काही जाणकारांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये होणाऱ्या वाढीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सातत्याने वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमती कारणीभूत आहेत. तसेच, केंद्र सरकारकडून इंधनावर आकारण्यात येणाऱ्या करामुळेही या किंमती वाढत्या राहिल्याचं सांगितलं जात आहे. कारण काहीही असलं, तरी या वाढत्या दरांमुळे सामान्यजनांचे मात्र हाल होऊ लागलेत एवढं नक्की!हेही वाचा

इंधनावरील अधिभार कमी करा- अशोक चव्हाण


संबंधित विषय
ताज्या बातम्या