PMC scam: वाधवा पितापुत्राच्या घराबाहेर निदर्शने, १२ आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

पंजाब आणि महाराष्ट्र को-आॅप बँक (pmc bank) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि एचडीआयएल (HDIL) कंपनीचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवा यांच्या घरासमोर आंदोलन करणं बँकेच्या ग्राहकांना महागात पडलं. खार पोलिसांनी बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी १२ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिलं. 

राकेश वाधवा आणि सारंग वाधवा या पितापुत्रांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या हे दोघेही मुंबईच्या आर्थर रोड तुरूंगात बंद आहेत. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सरोश दमानिया यांनी पीएमसी बँकेकडे गहाण असलेली आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेली एचडीआयएलची मालमत्ता विकून त्याद्वारे बँकेच्या खातेधारकांची देणी देण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली होती. 

हेही वाचा-PMC Scam : वाधवा पितापुत्राची कोठडी कायम, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने एचडीआयएलची संपत्ती लिलावात काढण्याचे आदेश दिले. त्यासाठी ३ सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले तसंच या कामात सहकार्य मिळण्यासाठी वाधवा पितापुत्रांना तुरूंगातून बाहेर काढत त्यांच्या निवासस्थानी ४ पोलिसांच्या सुरक्षेत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले होते.

या निर्णयावर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आरोपींना तुरूंगातून बाहेर काढत घरीच नजरकैदेत ठेवल्यास त्यांना जामीन दिल्यासारखं होईल, त्यामुळे या निर्णयाला स्थगिती मिळावी, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ईडीच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात केला. या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती आणली. 

त्यानंतर रविवारी पीएमसी बँक डिपाॅझिटर्स फोरमच्या सदस्यांनी वाधवा पितापुत्राच्या घराबाहेर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते त्यांच्या घराबाहेर जमले होते. परंतु आंदोलनकर्त्यांनी पोलिसांची परवानगी नसल्याने खार पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि काही वेळाने सोडून दिलं.

यासंदर्भात बोलताना खार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक गजानन कबुदुले म्हणाले की, रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आंदोलनर्त्यांनी वाधवा पितापुत्रांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु या आंदोलनाची परवानगी न घेतल्याने १२ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. 

दरम्यान पीएमसी बँकेचं पुनरुज्जीवन करून खातेदारांना दिलासा द्यावा, अशा मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना काही दिवसांपूर्वी दिलं.

हेही वाचा- PMC बँकेचं पुनरूज्जीवन? पवारांनी केली केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांशी चर्चा

पुढील बातमी
इतर बातम्या