पंजाब अँड महाराष्ट्र को. आॅप (पीएमसी) बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवा पितापुत्रांना तूर्तास आर्थर रोड तुरूंगातच रहावं लागणार आहे. कारण या दोघांना तुरुंगाऐवजी घरातच नजरकैदेत ठेवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.
राकेश वाधवा आणि सारंग वाधवा या पितापुत्रांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर बुधवारी सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने पीएमसी बँकेकडे तारण असलेली तसंच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेली एचडीआयएल कंपनीची संपत्ती लिलावात काढण्यास मंजुरी दिली.
हेही वाचा- PMC Scam: ‘एचडीआयएल’ची संपत्ती विकण्यास मंजुरी
सोबतच या सर्व प्रक्रियेत राकेश आणि सारंग वाधवा यांचं सहकार्य मिळावं, या उद्देशानेत् यांना आर्थर रोड तुरूंगातून बाहेर काढून त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी प्रत्येकी २ पोलिसांच्या नजरकैदेत ठेवा, असेही निर्देश न्यायालयाने दिले. या आदेशाविरोधात राज्य सरकारने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणी सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पूर्णपीठापुढे सुनावणी झाली.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ईडीच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आरोपींना तुरूंगातच ठेवण्याची मागणी केली. पीएमसी बँक घोटाळ्यात ७ हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या राकेश आणि सारंग वाधवा पितापुत्रांना कोठडीऐवजी त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवलं तर ते त्यांना जामीन मिळाल्याप्रमाणेच असेल, त्यामुळे या निर्णयाला स्थगिती मिळावी, अशी विनंती केली.
ही विनंती मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
हेही वाचा- PMC बँकेचं पुनरूज्जीवन? पवारांनी केली केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांशी चर्चा