रिलायन्स जिओसह एअरटेल आणि वोडाफोन-आयडियानेदेखील आपल्या टॅरीफ दरात ४० टक्के वाढ केली होती. हाच धक्का ग्राहकांना अजून पचला नाही. त्यात पुन्हा एकदा दरवाढ होण्याची शक्यता आहे. तोट्यातून बाहेर येण्यासाठी टेलिकॉम कंपन्या दरवाढ सुरूच ठेवणार असल्याची शक्यता आहे.
आगामी काही आठवड्यात प्रीपेड प्लानचे टॅरीफ पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ट्रायकडून दर निश्चित करण्यासाठी तयारी सुरू असल्याचं समजतंय. ट्रायनं दर निश्चित केल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रात घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात दर निश्चित झाल्यानंतर एअरटेलला सर्वाधिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. सध्या व्होडाफोन-आयडियाच्या तुलनेनं एअरटेल चांगली ४G सेवा देत आहे.
तोट्यातून बाहेर काढणं आवश्यक
टेलिकॉम कंपन्यांना तोट्यातून बाहेर येण्यासाठी टॅरीफ दरात सातत्यानं वाढ करावी लागणार आहे. शिवाय प्रति ग्राहक सरासरी २०० रुपये महसूल इतका मिळवण्याची आवश्यकता आहे, असं टेलिकॉम सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआय) संचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितलं.
मागील काही वर्षात टेलिकॉम कंपन्यांना तोटा सहन करावा लागत होता. रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर स्पर्धा आणखी तीव्र झाली. अधिकाधिक ग्राहकांना खेचण्यासाठी अनेकांनी आपले टॅरीफ दर घटवले. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना आणखी तोटा सहन करावा लागला असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा