पोस्टातून २० लाखांहून अधिक पैसे काढल्यास द्यावा लागणार टीडीएस

पोस्टाने टीडीएस कपात करण्याबाबत नवीन नियम जारी केला आहे. पोस्टाच्या विविध योजनांमधून २० लाख रुपयांहून अधिक रक्कम काढल्यास आता टीडीएस कापला जाणार आहे. हे नवीन नियम सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) वर देखील लागू आहेत.

प्राप्तिकर अधिनियम १९६१ च्या कलम १९४ एनच्या नवीन तरतुदीनुसार, गुंतवणूकदाराने मागील तीन आर्थिक वर्षांमध्ये आयटी रिटर्न भरले नसेल तर काढलेल्या रकमेमधून टीडीएस वजा केला जाईल. हे नवीन नियम १ जुलै २०२० पासून लागू केले आहेत.

नवीन नियमानुसार, जर एखादी व्यक्ती आयटीआर दाखल करत नसेल आणि त्याने २० लाखांपेक्षा अधिक आणि १ कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम काढली असेल तर २० लाखांवरील अधिकच्या जास्त रकमेवर २ टक्के  टीडीएस वजा केला जाईल. तर आर्थिक वर्षात सर्व योजनांमधून १ कोटीपेक्षा जास्त पैसे काढल्यास अधिकच्या रकमेवर ५ टक्के टीडीएस कापला जाईल.

आयटीआर भरणाऱ्यांसाठी एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढल्यास दोन टक्के टीडीएस वजा केला जाईल. विविध पोस्ट ऑफिसमध्ये टीडीएस कपात करण्याची जबाबदारी सेंटर फॉर एक्सलन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजी (सीईपीटी) वर आहे. सीईपीटीने विविध पोस्ट ऑफिसना तंत्रज्ञानाची मदत केली आहे, अशा ठेवीदारांना ओळखले आहे आणि संबंधित मंडळांना ती माहिती पुरवणार आहे.



हेही वाचा -

दिलासादायक! आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली

ठेवीदारांना दिलासा, पीपीएफ व्याजदरात कपातीचा आदेश चुकून निघाला

पुढील बातमी
इतर बातम्या