म्हाडा लॉटरी : ओसी रखडली, विजेते प्रतिक्षेत

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

'सरकारी काम नि सहा महिने थांब', अशी म्हण प्रचलीत आहे. पण म्हाडाच्याबाबतीत 'म्हाडाचे काम नि वर्षानुवर्षे थांब', असा अनुभव मुंबई मंडळाच्या लाॅटरीतील 406 विजेत्यांना येत आहे. 2015 च्या सोडतीतील मुलुंड आणि मालवणीतील 406 विजेत्यांना दोन वर्षांपासून घराचा ताबा मिळालेला नाही.

या 406 घरांसाठी ऑक्युपेशन सर्टिफिकेट (भोगवटा प्रमाणपत्र) मिळवण्याची प्रक्रिया रखडल्याने विजेत्यांना या घरांचा ताबा मिळू न शकलेला नाही. म्हाडाच्या या संथ कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करत विजेत्यांनी 'ओसी'चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी म्हाडाकडे केली आहे.

दोन वर्षे प्रतिक्षेत

मे 2015 मध्ये मुंबईतील 1049 घरांसाठी लाॅटरी काढण्यात आली होती. मुंबई मंडळाने विजेत्यांना शक्य तितक्या लवकर पात्रता निश्चिती करत घरांचा ताबा देण्याचे जाहीर केले होते. पण ही लाॅटरी काढून दोन वर्षे उलटून गेली तरी 1049 घरांपैकी 406 घरांचा ताबा 'ओसी'अभावी रखडला आहे.

घराचा ताबा कधी मिळणार? अशी विचारणा करत विजेते दोन वर्षांपासून म्हाडाचे उबंरठे झिजवत आहेत. पण म्हाडाकडून या विजेत्यांना कोणतेही ठोस उत्तरच देण्यात येत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

एकीकडे 1049 विजेत्यांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया सुरू असून दोन वर्षांत 400 विजेत्यांना घरांचा प्रत्यक्षात ताबा देण्यात आला आहे. तर अजूनही 650 विजेत्यांना घराचा ताबा देणे बाकी आहे.

मुलुंड येथील अल्प गटातील 182, तर मालवणीतील अल्प गटातील 224 घरांचे काम पूर्ण झाले आहे. पण या घरांना अद्याप ओसीच मिळालेली नाही. ओसी मिळवण्यासाठी मुंबई मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत, पण ओसीसाठी आवश्यक अटी म्हाडाकडून पूर्ण केल्या जात नसल्याने ओसी मिळण्यास विलंब होत आहे.

म्हाडाने जेव्हापासून चालू बांधकाम प्रकल्पातील घरांचा समावेश लाॅटरीत करणे सुरू केले आहे. तेव्हापासून घरांचा ताबा देण्यास विलंब होण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. त्यामुळे तयार प्रकल्पातील ओसी मिळवण्याची प्रक्रिया सुरू झालेल्या वा ओसी मिळालेल्या घरांचाच समावेश लाॅटरीत करावा, अशी मागणीही विजेत्यांकडून होत आहे.

मुलुंडच्या घरांना महिन्याभरात ओसी

मुलुंडच्या घरांविषयी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे ओसी लांबल्याचेही स्पष्ट केले. ओसी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिन्याभरात ओसी मिळेल आणि 182 विजेत्यांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, अशी माहिती दिली.

म्हणे, आठ दिवसांत ओसीचा प्रश्न मार्गी

मालवणीमधील 224 घरांच्या ओसीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पुढील आठ दिवसांत या घरांना ओसी मिळेल, अशी माहिती मुंबई मंडळाच्या गोरेगाव विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई लाइव्हला दिली. त्यामुळे आठ दिवसांत ओसी मिळेल का? यावर आता सर्वांचेच लक्ष असणार आहे.


हे देखील वाचा -

म्हाडा रहिवाशांसाठी खूशखबर..मिळणार 376 चौ. फुटांचे घर!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या