पत्राचाळीच्या बिल्डरचा 'ओसी' मिळवण्याकडे कानाडोळा

 Goregaon West
पत्राचाळीच्या बिल्डरचा 'ओसी' मिळवण्याकडे कानाडोळा
Goregaon West, Mumbai  -  

गोरेगावमधील सिद्धार्थनगरच्या पत्राचाळीतील 306 घरांचा ताबा म्हाडाने 2016 मध्ये काढलेल्या लाॅटरीतील विजेत्यांना मिळेल का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. कारण वर्ष उलटून गेले, तरी पत्राचाळीतील या 306 घरांचे आॅक्युपेशन सर्टिफिकेट (भोगवटा प्रमाणपत्र) मिळवण्याकडे पत्राचाळीचा बिल्डर लक्षच देत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

म्हाडाच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने विजेत्यांना घरांचा ताबा वेळेत देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मुंबई मंडळाच्या संबंधित विभागाने गेल्या तीन-चार महिन्यांत ओसी मिळवून देण्यासाठी बिल्डरला डझनवार पत्र पाठवली. यापैकी एकाही पत्राला बिल्डरने उत्तर दिलेले नाही. म्हाडाकडून बिल्डरला नुकत्याच पाठवण्यात आलेल्या एका पत्राची प्रत 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागली आहे.

मुंबई मंडळाकडे घरेच नसल्याने मंडळाने वादग्रस्त आणि बंद पडलेल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील म्हाडाच्या हिश्श्यातील 306 घरांचा समावेश 2016 च्या लाॅटरीत केला. त्यावरुन म्हाडावर सडकून टीकाही झाली होती. महत्त्वाचे म्हणजे या घरांचे बांधकाम बिल्डर पूर्ण करणार नाही आणि घरांचा ताबाही विजेत्यांना मिळणार नाही, याची खात्री म्हाडातील काही अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी या घरांच्या लाॅटरीतील समावेशाला विरोध दर्शवला होता. अखेर अधिकाऱ्यांची ही भीती खरी ठरली आहे.


मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ

मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राचाळीसंदर्भात एक विशेष बैठक घेत बिल्डरला 15 दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार बिल्डरने पुनर्विकास कसा आणि कधी मार्गी लावणार, यासंबंधीचा आराखडा सरकार आणि म्हाडाकडे सादर केला खरा. पण हा आराखडा केवळ कागदावरच आहे.

कारण, या आराखड्यानुसार तसेच मुख्यमंत्र्यांसमोर दिलेल्या आश्वसनानुसार बिल्डरने महिन्याभरात 306 घरांच्या ओसीचा प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले होते. पण जुलै उजाडला तरी या घरांच्या ओसीची साधी प्रक्रियाही बिल्डरने सुरू केलेली नाही. त्यामुळे बिल्डर मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे.


ओसी मिळण्यास विलंबच

या घरांचे काम 100 टक्के पूर्ण झालेले नाही. त्यातही ओसी घेण्यासाठी बिल्डरने पालिकेच्या ज्या अटी पूर्ण करायला हव्यात, त्या अटीही पूर्ण केलेल्या नाहीत. ओसी मिळवण्यासाठी प्रकल्पातील भुयारी वाहनतळाच्या दिशेने जाण्यासाठी एक रस्ता तयार करणे बंधनकारक आहे. असे असताना अजूनही हा रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे हा रस्ता कधी तयार होणार आणि ओसी कधी मिळणार? हा प्रश्न आहे.


रेरात नोंदणीसाठीही बिल्डर पुढे येईना!

ओसीसह पत्राचाळ प्रकल्पाची 'महारेरा'त नोंदणी करावी, यासाठीही गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून मुंबई मंडळाकडून बिल्डरला पत्रांवर पत्र पाठवली जात आहेत. पण याकडेही बिल्डर साफ कानाडोळा करत असल्याची माहिती संबंधित विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

तर, 'महारेरा' नोंदणीसंदर्भातील पत्राची प्रतही 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागली आहे. पत्राचाळ प्रकल्पाद्वारे बिल्डरने 1000 कोटींहून अधिकचा चुना म्हाडाला लावला असून 650 हून अधिक रहिवाशांचीही फसवणूक केली आहे. त्यामुळे हा मोठा घोटाळा असल्याने 'रेरा'त नोंदणी झाली तर बिल्डरच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. त्यामुळेच बिल्डर 'रेरा'त नोंदणी करण्यासाठी पुढे येत नसल्याचे म्हटले जात आहे.


306 घरांच्या ओसीसाठी बिल्डरकडे पाठपुरावा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत बिल्डरने मंत्र्यांसमोर एका महिन्यात ओसी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही एक महिना वाट पाहू. पण त्यानंतर ओसी मिळाली नाही आणि घरांचे काम पूर्ण झाले नाही, तर निश्चित बिल्डरविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेऊ.


सुभाष लाखे, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा
हे देखील वाचा -

म्हाडाला 1 हजार कोटींचा गंडा, बिल्डर अजूनही मोकाटच!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Loading Comments