Advertisement

म्हाडाचा अट्टाहास पत्राचाळीतील 306 विजेत्यांना पडणार भारी?


म्हाडाचा अट्टाहास पत्राचाळीतील 306 विजेत्यांना पडणार भारी?
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2016 च्या सोडतीतील घरांची संख्या वाढवण्यासाठी म्हाडाने अट्टाहासाने पत्राचाळ, गोरेगाव या वादग्रस्त घोटाळ्यात अडकलेल्या प्रकल्पातील 306 घरे सोडतीत घेतली. पण एक वर्षे पूर्ण होत आले तरी या घरांचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच हा प्रकल्पच वादग्रस्त ठरल्याने, प्रकल्पावर विशेष एक सदस्यीय समितीने ठपका ठेवत कारवाईची शिफारस केल्याने आता प्रकल्पास ओसी मिळण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. ओसी मिळाली नाही म्हणून ही घरे लटकली तर, म्हाडाचा अट्टाहास या 306 विजेत्यांना चांगलाच भारी पडणार आहे.

गुरू आशिष बिल्डरमार्फत 2008 पासून पत्राचाळीचा पुनर्विकास केला जात आहे. मात्र बिल्डरने अजूनही प्रकल्प मार्गी न लावल्याने प्रकल्प रखडला आहे. तर दुसरीकडे म्हाडाला यातून अंदाजे 2300 घरेही अजून मिळालेली नाहीत. त्यातच या प्रकल्पात कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचे म्हाडा स्तरावरील चौकशीत सिद्ध झाले आहे. गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांच्या एक सदस्यीय समितीने 414 कोटींचा घोटाळा या प्रकल्पात झाल्याचा ठपका ठेवला आहे. यात बिल्डरबरोबर अधिकारीही दोषी असल्याचे म्हणत कारवाईची शिफारसही केली आहे. हा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे. अहवालात 414 कोटींचा गैरव्यवहार असल्याचे म्हटले असले तरी, म्हाडाच्या अहवालानुसार हा गैरव्यवहार 1 हजार कोटींचा आहे.

हा वादग्रस्त प्रकल्प घोटाळ्यात अकडलेला असतानाही या प्रकल्पातील म्हाडाने 306 घरे 2016 च्या सोडतीत समाविष्ट करत त्यांची सोडत काढण्यात आली. मुळात गोरेगाव विभागाने त्यावेळी ही घरे घेऊ नयेत, घरांचे काम बिल्डर पूर्ण करणार नाही. केले तरी ओसी मिळण्यात अडचणी येतील, असे म्हणत स्पष्ट नकार दिला होता. मात्र म्हाडाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी केवळ सोडतीतील घरांची संख्या वाढवण्यासाठी वादग्रस्त प्रकल्पातील घरे घेतली आणि विजेत्यांचे नुकसान केले. दरम्यान 2016 च्या सोडतीतील ओसी मिळालेल्या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अंदाजे 40 जणांना ताबा देण्यात आला अाहे. पत्राचाळीतील घरांचे काम अद्याप 80 टक्केच पूर्ण झाले असल्याने ताबा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हे काम कधी पूर्ण होईल आणि ओसी कधी मिळेल,याचे ठोस उत्तर मंडळाकडेही नाही.

याविषयी मुंबई मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिल्डर काम करत नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे काम पूर्ण करुन देण्यासाठी मंडळाला सातत्याने बिल्डरकडे पाठपुरावा करत स्मरणपत्रे द्यावी लागत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे. म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी "बिल्डरच्या मुसक्या आवळू पण वर्षभरात काम पूर्ण करत विजेत्यांना ताबा देऊ", असे आश्वासन दिले होते. पण हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यातच आता दोन दिवसांत झेंडे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे यानंतर येणाऱ्या उपाध्यक्षांसमोर बिल्डरकडून हे काम पूर्ण करून घेत ओसी मिळवून घेण्याचे आवाहन असणार आहे. उपाध्यक्ष झेंडे यांच्याशी यासंबंधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते बैठकीत असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा