काचेच्या इमारतींमधील सेंट्रलाईज्ड एसी ठरतात कर्दनकाळ

गोरेगावमधील ‘टेक्निक प्लस वन’ इमारतीला लागलेल्या आगीच्या दुघर्टनेनंतर पुन्हा एकदा ग्लास फसाड इमारतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या काचेच्या तावदानांनी आच्छादलेल्या इमारतींमध्ये आगीचा धूर बाहेर जाण्यास मार्गच मोकळा नसल्याने आगीत गुदमरून ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले. आग विझवण्याचं कार्य करणाऱ्या जवान आणि अधिकाऱ्यांनाही श्वसनाचा त्रास जाणवू लागला. या इमारतीत मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणेसाठी (सेंट्रलाइज्ड एसी) सर्व भाग बंदिस्त करण्यात आल्याने धूर बाहेर जाण्यास मोकळा मार्गच नसल्याने अनेक जण गुदमरल्याचं म्हटलं जात आहे.

नियम काय म्हणतो?

मुंबईत नव्याने बांधण्यात आलेल्या ग्लास फसाड इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मुंबई अग्निशमन दलाने २१ सप्टेंबर २०१६ मध्ये परिपत्रक जारी करून ते संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं होतं. यामध्ये ग्लास फसाड इमारत बांधणाऱ्यांना स्टेअरकेस, लिफ्ट एरिया तसंच कॅरीडोरचा भाग खुला ठेवण्याचे निर्देश दिले होते.

तसंच अनेक ठिकाणी ग्लास फसाडच्या खिडक्या खुल्या ठेवण्याचे निर्देशही दिले होते. नियमानुसार अशा इमारतींमध्ये प्रत्येक मजल्यावर किमान अडीच टक्के भाग खुला ठेवणं बंधनकारक आहे. मात्र या सर्व नियमांचे पालन टेक्निक प्लस वन इमारतींमध्ये झालेलं दिसून आलं नाही.

खिडक्या नसल्याने धूर अडकला

या इमारतींमधील सर्व भाग काचांनी बंद असल्याने आगीच्या दुघर्टनेनंतर धूर बाहेर न जाता आतल्या आतच पसरला. त्यातच इलेक्ट्रीक केबल जळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना धुराचा त्रास जाणवू लागला. वाऱ्यामुळे धूर बाहेर न पडता आतच राहिला. कारण विरुद्ध दिशेला खिडक्या किंवा खुला भाग नसल्याने धुराला बाहेर जाण्यास मार्गच नव्हता.

यामुळे याचा त्रास अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवताना झाला. या धुरामुळे आतमध्ये जाणं शक्य नसल्याने आत कोण अडकलं किंवा काय याचीही माहिती प्रारंभी मिळू शकली नव्हती, असं अग्निशमन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

अशाप्रकारच्या कमर्शियल इमारतींमध्ये सेंट्रलाईज्ड एसी असल्याने त्यासाठी सर्व बाजू बंदिस्त कराव्या लागतात. त्यामुळे ही इमारत देखील सर्व बाजूंनी बंदिस्त करण्यात आली होती. परिणामी आग आतल्या आत पसरली.

४ जणांचे बळी घेतले

४ वर्षांपूर्वी ग्लास फसाड इमारत असलेल्या अंधेरीतील लोटस बिझनेस सेंटरला आग लागली होती. यामध्ये अग्निशमन दलाचा जवान नितीन ईवलेकर यांचा गुदमरून तसेच जखमी होऊन मृत्यू झाला होता. या आगीत सुदैवाने मोठी मनुष्यहानी टळली असली, तरी ही आग ४ जणांचे बळी घेऊन गेली.


हेही वाचा-

फ्लोटिंग क्रूझ रेस्टाॅरंटचा मुक्काम चार दिवस समुद्रातच...

एआरके डेकचं फ्लोटिंग रेस्टाॅरंट चार महिन्यानंतर पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत!


पुढील बातमी
इतर बातम्या