धारावीत आणखी ४ नवे रुग्ण, संख्या ४७ वर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील धारावीला कोरोना व्हायरसनं चांगलच टार्गेट केलं आहे. दररोज नवे रुग्ण धारावीत आढळत आहेत. धारावीत सर्वाधित झोपडपट्ट्या असल्यानं कोरोनाचा मोठा धोका आहे. त्यामुळं या परिसरातील सर्व रहिवाशांची तपासणी केली जात. नुकताच धारावीत ४ नवे रुग्ण आढळले असून, यामधील एका ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 

धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या ४७ झाली असून मृतांची संख्या ५ वर पोहोचली आहे. सोमवारी सापडलेल्या ४ रुग्णांपैकी एक कोरोनाबाधित महिला ही दादरच्या सुश्रृषा हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. कोरोनाच्या ६० वर्षीय रुग्णावर सायन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. हा रुग्ण धारावीच्या नेहरू चाळमध्ये राहत होता. तर इतर ३ रुग्णांपैकी एक रुग्ण इंदिरा नगर, जनता हौसिंग सोसायटी आणि गुलमोहर चाळीत राहतात. यामध्ये २ महिलांचा समावेश आहे.

कोरोनाची लागण झालेली गुलमोहर चाळीतील ३४ वर्षीय महिला दादरच्या सुश्रृषा रुग्णालयात नर्स आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांचं सँपल घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे.

धारावीत कोरोनाचे  १५ नवीन रुग्ण तर मुंबईचं मध्यवर्ती केंद्र असलेल्या दादरमध्ये कोरोनाचे २ नवीन रुग्ण रविवारी आढळून आले होते. धारावीत सापडलेल्या १५ नव्या कोरोना रुग्णांपैकी ९ जणांना आधीच राजीव गांधी क्वॉरंटाइन केंद्रात ठेवण्यात आलं होतं. तिथं या सर्वांवर उपचार सुरू आहेत. कोरोना पाॅझिटिव्ह निघालेले हे सर्व नवीन रुग्ण धारावीतील सोशल नगरमध्ये दगावलेल्या आणि मदिना नगरमधील करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. तसंच केईएममधील कर्मचाऱ्यांच्याही संपर्कात हे रुग्ण आले होते. तर उरलेल्या ६ नवीन कोरोना रुग्णांपैकी ४ जण हे सोशल नगरजवळच्या शास्त्रीनगर येथील रहिवासी आहेत आणि २ जण जनता हाऊसिंग सोसायटीमधील रहिवासी आहेत. या १५ नव्या रुग्णांमध्ये एका २० आणि २४ वर्षांच्या तरुणीचा समावेश आहे. तर इतर पुरुष हे १८ ते ६६ वयोगटातील आहेत.


हेही वाचा -

Coronavirus Updates: मुख्यमंत्री सहायता निधीत १९७ कोटी जमा

कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार - उदय सामंत


पुढील बातमी
इतर बातम्या