अग्निशमन दलात अधिकारी, कर्मचाऱ्यांची २५ टक्के पदं रिक्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई अग्निशमन दलात तब्बल २५ टक्के पदं रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने पदं रिक्त असल्याने अग्निशमन दलावर कामाचा प्रचंड ताण येत आहे. रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी केली जात आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अग्निशमन दलातील रिक्त पदांची माहिती मागविली होती. अग्निशमन दलाकडून त्यांना रिक्त पदांची माहिती देण्यात आली. यानुसार, अग्निशमन दलात १४ प्रकारची ३,६९४ पदं आहेत. यापैकी २,७६० पदं भरण्यात आली आहेत. उर्वरित ९३४ पदं रिक्त आहेत.

अग्निशमन दलात २,३४० अग्निशामकांची पदं आहेत. त्यापैकी ६०४ पदं रिक्त आहेत, तर चालक, यंत्रचालकांची १५९ पदं, प्रमुख अग्निशामकांची ६९, दुय्यम अधिकाऱ्यांची ६६, वरिष्ठ केंद्र अधिकाऱ्यांची १७, केंद्र अधिकाऱ्यांची १० पदं रिक्त आहेत. उपमुख्य तांत्रिक अधिकारी पदही रिक्तच आहे. अग्निशमन दलाच्या कार्यशाळेत २९ प्रकारची १२५ पदं असून त्यापैकी ६२ पदं रिक्त आहेत.  

कमी मनुष्यबळामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे रिक्त पदं तातडीने भरावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या