उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील दुकाने उघडण्यास परवानगी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनच्या नियमांतर्गत उल्हानगर महापालिका परिसरात येणारी दुकाने केवळ सम-विषम पद्धतीनेच सुरू ठेवण्यास परवानगी होती. परंतु आता महापालिकेने ही अट काढून टाकत शहरातील दोन्ही बाजूंची दुकाने एकाचवेळी सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उल्हासनगरमध्ये स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार पी-१ व पी-२ नुसार दुकाने केवळ सम-विषम पद्धतीनेच सुरू ठेवता येत होती. म्हणजे एका दिवशी रस्त्याच्या केवळ एकाच बाजूची दुकाने सुरू ठेवता होती. बाजारपेठ परिसरातील गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. परंतु ही अट १८ आॅगस्ट २०२० पासून काढून टाकण्यात आली आहे. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी विशेष आदेश काढून व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यानुसार मंगळवार सकाळ ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकानदारांना रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील दुकाने एकाचवेळी सुरू करता येणार आहे. 

हेही वाचा- मिरा-भाईंदरमधील दुकाने सातही दिवस राहणार सुरू

दुकानातील सर्व कर्मचारी यांना मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं यापुढेही बंधनकारक असेल. महापालिकेने घालून दिलेल्या वेळेआधी किंवा वेळेनंतर दुकाने सुरू राहिल्याचं आढळून आल्यास दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. माॅल, मार्केट काॅम्प्लेक्स, जीव व स्विमिंग पूल वगळता इतर दुकांनासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. हाॅटस्पाॅट परिसरात जुनेच नियम लागू असतील. 

उल्हासनगरमध्ये सोमवारी कोरोनाचे नवे ३८ रुग्ण आढळून आले. सद्यस्थितीत उल्हासनगरमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ७४०९ एवढी झाली आहे. ज्यामध्ये अॅक्टिव्ह रुग्ण ३०३ असून ६९२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत १८५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

याआधी मिरा-भाईंदर महापालिका परिसरात देखील दुकानांसाठी असलेली सम-विषमची अट काढून टाकण्यात आली आहे. 

हेही वाचा- गुड न्यूज! मिरा-भाईंदरमध्ये हाॅटेल उघडण्यास परवानगी

पुढील बातमी
इतर बातम्या