Advertisement

गुड न्यूज! मिरा-भाईंदरमध्ये हाॅटेल उघडण्यास परवानगी

कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या मिरा-भाईंदर परिसरातील हाॅटेल उद्योगाला स्थानिक प्रशासनाने दिलासा देऊ केला आहे.

गुड न्यूज! मिरा-भाईंदरमध्ये हाॅटेल उघडण्यास परवानगी
SHARES

कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या मिरा-भाईंदर परिसरातील हाॅटेल उद्योगाला स्थानिक प्रशासनाने दिलासा देऊ केला आहे. ६ आॅगस्टपासून परिसरातील उपहारगृह आणि अथितीगृह एकूण क्षमतेच्या ३३ टक्के क्षमतेने सुरू करण्यास मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. 

मागील ४ महिन्यांपासून हाॅटेल आणि उपहारगृह बंद असल्याने हा व्यवसाय चालवणारे व्यावसायिक आणि या उद्याेगावर अवलंबून असणारे कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच महाराष्ट्र सरकारने मिशन बिगीन अगेनच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करताना हाॅटेल व्यवसाय काही अटी-शर्थींच्या सुरू करण्यास परवानगी दिल्यापासून मिरा-भाईंदर शहरातील हाॅटेल व्यावसायिक देखील स्थानिक प्रशासनाकडून कधी परवानगी मिळते, या प्रतिक्षेत होते. 

त्यानुसार मिरा-भाईंदर महापालिका अतिरिक्त आयुक्त महेश वरूडकर यांनी ६ आॅगस्ट रोजी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात नमूद केल्यानुसार महानगरपालिकेच्या जा.क्र.मनपा/वैद्यकीय/११६६/२०-२१ दि ३१/०७/२०२० च्या आदेशान्वये हाॅटस्पाॅट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये राज्य शासनाचे दि. २९ जुलै २०२० च्या आदेशान्वये जाहीर केल्याप्रमाणे Mission Begain Again राहील, असे जाहीर केले आहे. त्यानुसार शासनाच्या दि. ६ जुलै २०२० च्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे परिशिष्ट एक मध्ये नमूद केलेल्या अटींची पूर्तता करून एकूण क्षमतेच्या ३३% च्या मर्यादेत उपहारगृह व अतिथीगृह (हाॅटेल्स) सुरू ठेवण्यास हरकत नाही. असं स्पष्ट करण्यात आलं आहे.  

हेही वाचा- बापरे! ठाण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेली १ लाखांच्या पुढे

मिरा-भाईंदरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने स्थानिक प्रशासन प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीपूर्वक टाकत आहे. गुरूवारी शहरात ११९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मिरा-भाईंदरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ९०७५ रुग्ण आढळून आले आहेत. तर २९८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे.

अशाही स्थितीत मिरा-भाईंदर महापालिका स्थानिक उद्योगधंदे ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. सद्यस्थितीत शहरातील सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेदरम्यान सम-विषम पद्धतीने उघडण्यात येत आहे. यामुळे दुकानदारांमध्ये चांगलीच नाराजी आहे. आधीच लाॅकडाऊनमुळे ग्राहक येत नसल्याने व्यवसाय ढेपाळला आहे. त्यात एक दिवसाआड दुकान सुरू करावं लागत असल्याने दुकानाचं भाडं, कामगारांचा पगार काढणं देखील मुश्कील झाल्याचं दुकानदार सांगत आहेत. यामुळे सम-विषम पद्धत बंद करून पूर्ण वेळ दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्थानिक दुकानदार करू लागले आहेत.       

हेही वाचा- महाराष्ट्रात लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला; नव्या आदेशात पाहा काय सुरु-काय बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा