मुंबईहून आणखी एक 'अमृत भारत एक्सप्रेस' धावणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी देशभरात 9 नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. यामध्ये अलीपुरद्वार-पनवेल या नव्या एक्सप्रेसचा समावेश आहे.

या निर्णयामुळे मुंबई (mumbai), ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई परिसरातील प्रवाशांना थेट पूर्व भारत आणि उप-हिमालयीन भागाशी जोडणारी, परवडणारी आणि लांब पल्ल्याची नवी रेल्वे सेवा मिळणार आहे.

अमृत काळाच्या संकल्पनेतून सुरू झालेली अमृत भारत एक्सप्रेस ( ही पूर्णपणे नॉन-एसी, लांब पल्ल्याची स्लीपर ट्रेन आहे.

विशेषतः स्थलांतरित कामगार, विद्यार्थी आणि सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा डिझाइन करण्यात आली आहे.

डिसेंबर 2023 पासून सुरू झालेल्या या सेवेच्या 30 गाड्या आधीच कार्यरत आहे. आता आणखी 9 गाड्यांची भर पडली आहे.

या नव्या सेवेचा मुंबईजवळील टर्मिनस पनवेल ठेवण्यात आला आहे. पनवेल हे नवी मुंबई, रायगड आणि कोकण भागासाठी महत्त्वाचे जंक्शन असल्याने, सीएसएमटी किंवा लोकलवरचा ताण कमी करण्यासही मदत होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रवाशांसाठीही ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.

ट्रेन क्रमांक 11031 पनवेल–अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस पनवेलहून दर सोमवारी सकाळी 11:50 वाजता सुटणार आहे. ही ट्रेन अलीपुरद्वारला बुधवारी दुपारी 1:50 वाजता पोहोचणार आहे.

तसेच ट्रेन क्रमांक 11032 अलीपुरद्वार–पनवेल अमृत भारत एक्सप्रेस अलीपुरद्वारहून दर गुरुवारी पहाटे 4:45 वाजता सुटणार आहे. तसेच पनवेलला ही ट्रेन शनिवारी पहाटे 5:30 वाजता पोहोचणार.

थांबे : कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, मिर्झापूर, पं. दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, कटिहार, न्यू जलपाईगुडी, सिलीगुडी यांसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर ही एक्सप्रेस थांबणार आहे.

रेल्वेच्या माहितीनुसार, अमृत भारत एक्सप्रेसचे भाडे अंदाजे 500 रुपये प्रति 1000 किलोमीटर इतके ठेवण्यात आले आहे. कमी अंतरासाठी त्या प्रमाणात भाडे आकारले जाणार आहे.

सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल असा दर निश्चित करण्यात आला आहे.

11 जनरल क्लास डबे, 8 स्लीपर क्लास डबे, 1 पॅन्ट्री कार, 2 सेकंड क्लास-कम-लगेज-कम-गार्ड व्हॅन, दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र आणि सुलभ कंपार्टमेंट असेल.

ही गाडी पूर्णपणे नॉन-एसी असली तरी आराम, टिकाऊपणा आणि सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे.


हेही वाचा

मध्य रेल्वेकडून कोल्हापूर, नांदेड आणि अमरावतीसाठी विशेष गाड्या

कल्याण डोंबिवलीत मनसे-शिंदे सेना युती जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या