मुंबईत अजूनही ४ हजार बेड्स उपलब्ध

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत दररोज नव्याने कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८ ते १० हजारादरम्यान स्थिरावली असली तरी दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील १० हजाराच्या घरात आहे. यामुळे रुग्ण संख्या वाढूनही आज ३ हजार ९०० रुग्णशय्या रिक्त/उपलब्ध आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे (bmc) आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड १९ संसर्ग परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी ऑनलाईन बैठकीत घेतला. त्यावेळी चहल यांनी ही माहिती दिली.

यावेळी इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं की, मुंबईमध्ये साधारणत: १० फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट आली. असं असलं तरी दैनंदिन रुग्णांमध्ये सुमारे ८५ टक्के हे लक्षणं नसलेले बाधित रुग्ण आहेत. 

पुरेसे बेड्स

मुंबईत (mumbai) एकूण १५३ कोविड रुग्णालये असून त्यामध्ये सध्या २० हजार ४०० बेड्स आहेत. येत्या आठवड्यात ही संख्या २२ हजार होईल. १० फेब्रुवारी २०२१ पासून आजमितीपर्यंत १०५० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. दैनंदिन बाधित रुग्ण संख्या आता ८ ते १० हजारादरम्यान स्थिरावली असली तरी दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील १० हजाराच्या घरात आहे. यामुळे रुग्ण संख्या वाढूनही आज ३ हजार ९०० बेड्स रिक्त/उपलब्ध आहेत. मोठ्या खासगी रुग्णालयांमधून बरे होत आलेल्या आणि आॅक्सिजन पुरवठ्याची गरज नसलेल्या रुग्णांना स्थानांतरित करण्यासाठी निरनिराळे हॉटेल्स संलग्न करुन देण्यात येत आहेत.

हेही वाचा- जाणून घ्या कुठला मास्क अधिक प्रभावी? चौथ्या नंबरचा मास्क कधीच वापरू नये

रेमडेसिवीरसाठी प्रयत्न सुरु

रेमडेसिवीर इंजेक्शनसह इतर औषधांची कमतरता भासणार नाही, याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या २ लाख मात्रा खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यातील २५ हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. अधिक पुरवठा लवकर व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.

आॅक्सिजन पुरवठा : ६ समन्वय अधिकारी

त्याचप्रमाणे मागील आठवड्यात रुग्णवाहिकांच्या ताफ्यामध्ये ३५० रुग्णवाहिका नव्याने दाखल झाल्या आहेत. त्यासोबत आॅक्सिजन पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महानगरपालिकेकडून ६ समन्वय अधिकारी अन्न व औषध प्रशासन खात्याकडे नेमण्यात आले आहेत. तर मुंबईतील प्रत्येकी ४ विभागांमागे एक याप्रमाणे एकूण २४ प्रशासकीय विभागांसाठी ६ आॅक्सिजन पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत, जे तातडीच्या स्थितीत आॅक्सिजन उपलब्ध करुन देऊ शकतील. मुंबईतील ६४ नर्सिंग होममध्ये आॅक्सिजन सुयोग्य व काटकसरीने उपयोग करण्याबाबत प्रशिक्षण देण्याची कार्यवाहीदेखील सुरु करण्यात आली आहे.

अवाजवी बिलांसाठी पथके

खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी बिलांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ३५ रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिल तयार होताच त्याचं स्वत:हून लेखापरीक्षण करण्यात येतं.

चाचण्यांच्या अहवालासाठी नियोजन

कोरोना चाचणीचा (coronavirus) अहवाल २४ तासांच्या आत देण्याच्या सूचना सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने अँटीजेन टेस्ट करावी. त्यात बाधित आढळले तर त्यांचं विलगीकरण करुन, आरटीपीसीआर चाचणी करावी, जेणेकरुन बाधित रुग्ण वेळीच शोधता येतील व आरटीपीसीआर चाचण्यांवरील ताणही कमी होईल, अशी सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ही सूचना तातडीने अंमलात आणण्यासाठी सूचना निर्गमित करण्यात येतील, असंही इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं.

(around 4 thousand beds available in mumbai for covid 19 patients says bmc commissioner iqbal singh chahal)

हेही वाचा- महाराष्ट्राला रेमडेसिवीर न दिल्यास औषध साठा जप्त करू, नवाब मलिकांचा कंपन्यांना इशारा

पुढील बातमी
इतर बातम्या