बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, पण त्या नऊ दिवसांचा पगार कट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वेतनवाढसोबतच इतर मागण्यांसाठी जानेवारी महिन्यात तब्बल ९ दिवस बेस्ट कर्मचारी संपावर गेले होते. मात्र, बेस्ट प्रशासनानं दिलेल्या आश्वासनानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या जानेवारी महिन्याच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. परंतु, संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचा नऊ दिवसांचा पगार कापण्यात आला आहे. त्यामुळं बेस्ट कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.

२२ दिवसांचा पगार 

जानेवारी महिन्याच्या पगाराची स्लिप बेस्ट कर्मचाऱ्यांना बुधवारी मिळाली आहे. या स्लिपमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ असून ही पगार वाढ तीन ते चार हजार रुपये आहे. त्यामुळं बेस्ट कामगार सुखावला आहे. मात्र, संप काळातील नऊ दिवसांचा पगार कापल्यामुळे जानेवारी महिन्यातील फक्त २२ दिवसांचा पगार आला आहे. दरम्यान, हा वाढीव पगार शुक्रवारपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँकेत जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'या' मागण्यांसाठी संप

आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बेस्ट अर्थसंकल्पाचं मुंबई महानगर पालिकेच्या अ अर्थसंकल्पात विलीनीकरण करावं, २००७ साली भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची मास्टर ग्रेडमध्ये वेतन निश्चिती करावी आणि कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू करावी, या मुख्य मागण्यांसाठी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे ३० हजारांहून अधिक कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते.

मध्यस्थ्याची नेमणूक

दरम्यान संपाच्या अखेर नवव्या दिवशी उच्च न्यायालयानं संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक मध्यस्थ नेमला. तसंच, तीन महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.


हेही वाचा

सिडकोच्या 1100 घरांची सोडत लवकरच सुरू होणार

खुशखबर! सीबीएसईचे पेपर झाले सोपे


पुढील बातमी
इतर बातम्या