पालिकेविरोधात अफवा पसरवणाऱ्या भाजपाच्या प्रवक्त्याला अटक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ट्विटरवर मुंबई महानगरपालिकेची बदनामी केल्याप्रकरणी आणि अफवा पसरवल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेला हा मुंबईतील भारतीय जनता पक्षाचा प्रवक्त्या असल्याचं समोर येत आहे. सध्या जामिनावर त्यांची सुटका झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं एका जिवंत माणसाला स्मशानभूमीत नेऊन ठेवल्याचं सांगत भाजपचे मुंबई प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर इथले रहिवासी असलेले नखुआ यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. ज्यात रुग्णवाहिकेतून एका व्यक्तीला स्मशानभूमीत नेण्यात आलं होतं. यासोबत असा दावा देखील केला होता की, जिवंत माणसाला स्मशानभूमित घेऊन गेलं. सोबतच पालिकेला टॅग करून आरोप देखील केले होते.

“हे धक्कादायक आहे. एक जिवंत माणूस बीएमसीने स्मशानभूमीत नेला. मला वाटतं की # महावसुली आघाडी सरकारचं स्मशानभूमीतून काही महावसुलीचं टार्गेट असेल,” असं सुरेश नाखुआ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

ट्विटरवर हे ट्विट व्हायरल झालं. त्यानंतर पालिका, राज्य सरकारला लोकांच्या टिकेचा सामना करावा लागला. म्हणूनच पालिकेच्या ट्विटर हँडलवरून नखुआ यांना व्हिडीओच्या तपशिलाविषयी विचारपूस केली. पण नखुआ यांनी कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप पालिकेनं केला.

त्यानंतर मुंबईत अशी कोणतीही घटना घडली नव्हती आणि व्हिडिओ वेगळ्या ठिकाणचा असू शकतो असं सांगून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी भोईवाडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भोईवाडा पोलिसांनी बुधवारी नखुआला नोटीस बजावली. गुरुवारी सकाळी त्यांचे निवेदन नोंदवण्यासाठी त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून अटक करण्यात आली.

बुधवारी नखुआ यांनी ट्वीट केलं होतं की, "समीत ठक्कर आणि सुनैना होले यांना लक्ष्य केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार माझ्या मागे आहे. गेल्या २४ तासात त्यांनी माझ्यासाठी पालिका जेएमसी, डीएमसी, वैद्यकीय अधिकारी, भोईवाडा पोलीस बंदोबस्त तैनात केले आहेत.  मी इथेच आहे आणि कुठेही जात नाही."

गुरुवारी रात्री १२.४९ वाजता दुसऱ्या ट्विटमध्ये दिलगिरी व्यक्त केली की, "मी २०/०४/२०२१ रोजी एक व्हिडिओ अपलोड केला होता. ज्यामध्ये एका जिवंत माणसाला स्मशानभूमीत नेण्यात आलं होतं. मला घटनेचं ठिकाण माहित नव्हतं. हा व्हिडिओ मला अस्वस्थ करणारा होता. अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी सांगत होतो. लोकांमध्ये भिती पसरवण्याचा माझा हेतू नव्हता @mybmc @CPMumbaiPolice,"असं त्यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटलं.


हेही वाचा

जिवंत कोरोना रुग्णाला अंत्यसंस्कारासाठी नेलं? भाजपाच्या आरोपावर पालिकेचं ट्विटर वॉर

पुढील बातमी
इतर बातम्या