मुंबईत 20 ते 27 एप्रिलदरम्यान 5% पाणी कपात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेची क्षमता आणि दाब सुधारण्यासाठी महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत वॉटर टनेलमार्फत चार्जिंग, फ्लशिंग, क्लोरीनेशन आणि डी-क्लोरीनेशनची कामे करण्यात येणार आहेत. ही कामे 20 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान पार पडणार असून या कालावधीत मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यात 5 टक्क्यांची कपात केली जाणार आहे.

महापालिकेने पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी दोन महत्त्वाचे वॉटर टनेल विकसित केले आहेत. वॉटर टनेल 1 अमर महाल (हेगडेवार गार्डन) येथून वडाळा (प्रतीक्षा नगर) मार्गे परळपर्यंत कार्यरत आहे. तसेच वॉटर टनेल 2 देखील अमर महाल येथून ट्रॉम्बे लो-लेव्हल आणि पुढे ट्रॉम्बे हाय-लेव्हल जलाशयापर्यंत सातत्याने कार्यरत आहे.

या टनेलमधील पाणीपुरवठा सुरळीत आणि सुरक्षित राहावा यासाठी नियमित देखभाल आवश्यक असते. त्याचाच एक भाग म्हणून चार्जिंग, फ्लशिंग, क्लोरीनेशन आणि डी-क्लोरीनेशनची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास आणि दाब वाढवण्यास मदत होणार आहे.

या कामांमुळे साधारण आठवडाभर काही भागांमध्ये 5 टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरातील कुर्ला पूर्व, मानखुर्द, देवनार, गोवंडी, घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड या भागांवर त्याचा परिणाम होणार आहे.

तसेच आयलंड सिटीतील फोर्ट, चर्चगेट, डोंगरी, मरीन लाईन्स, भायखळा, परळ, शिवडी, वडाळा आणि सायन या भागांमध्येही पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

महापालिकेने नागरिकांना या कालावधीत पाण्याचा योग्य आणि जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आवश्यक तेवढेच पाणी साठवून ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे. ही देखभाल कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा अधिक सुरळीत, दाबासह आणि गुणवत्तापूर्ण होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.


हेही वाचा

मुंबईत 1 मेपासून 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता

महाराष्ट्रात 8 नवीन ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्यात येणार

पुढील बातमी
इतर बातम्या