
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे मुंबईत पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली असून Brihanmumbai Municipal Corporation 1 मेपासून शहरात 10 टक्के पाणी कपात लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
15 एप्रिलपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये एकूण क्षमतेपैकी केवळ 33.60 टक्के म्हणजे सुमारे 4.86 लाख दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला दररोज सुमारे 4,000 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो.
मुंबईला मोडक सागर (Modak Sagar), तानसा (Tansa Lake), भातसा (Bhatsa Dam) आणि वैतरणा Vaitarna Lake या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून साठा जलद गतीने कमी होत असल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्याचा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल असा अंदाज असला तरी, यंदा पावसाळा उशिरा आल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे पाण्याचा साठा ऑगस्टपर्यंत टिकवण्यासाठी राज्य सरकारनेही काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या वर्षी मेच्या सुरुवातीला पाणीसाठा 20 टक्क्यांखाली गेला होता. मात्र, लवकर आलेल्या पावसामुळे परिस्थिती सुधारली होती. यंदा मात्र अशा अनिश्चिततेमुळे प्रशासन सतर्क आहे.
दरम्यान, परिस्थिती हाताळण्यासाठी मनपाने राज्य नियंत्रणाखालील अतिरिक्त जलसाठा मिळावा, अशी मागणीही केली आहे. जर अतिरिक्त पाणी मिळालं, तर कपात टाळता किंवा कमी करता येऊ शकते, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मुंबईचा पाणीपुरवठा सुमारे 175 किलोमीटर दूर असलेल्या तलावांवर अवलंबून आहे. या पाण्याचं वहन सुमारे 650 किमी लांबीच्या मुख्य पाइपलाइन आणि 6,000 किमी सेवा पाइपलाइनद्वारे केलं जातं.
उष्णतेची लाट वाढत असताना पाण्याची मागणीही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा
