
महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यात आणखी आठ ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक्स (Automated Driving Test Tracks) उभारण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे अशा सुविधा असलेल्या RTO कार्यालयांची एकूण संख्या आता 46 वर पोहोचणार आहे.
कल्याण, वसई-विरार, मालेगाव, धुळे, गोंदिया, सातारा, रत्नागिरी आणि कराड येथे हे नवीन ट्रॅक उभारले जाणार असून यासाठी सुमारे 86 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी Central Institute of Road Transport (CIRT) यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कंत्राटदारांची निवडही त्यांच्यामार्फत केली जाणार आहे.
हा विस्तार मागील वर्षी मे महिन्यात काढलेल्या 38 ADTT साठीच्या टेंडरचा भाग आहे, जो 166.69 कोटी रुपयांच्या BOT (Build-Operate-Transfer) मॉडेलवर मंजूर करण्यात आला होता. या पद्धतीत कंत्राटदार 5 वर्षे ट्रॅक चालवतील आणि त्यानंतर संबंधित RTO कडे हस्तांतर करतील.
नवीन आठ ट्रॅकसाठी सुरुवातीला 77.29 कोटींचा अंदाज होता. मात्र GST आणि आयटी इन्फ्रास्ट्रक्चर खर्चामुळे तो सुमारे 8 कोटींनी वाढला. सुधारित प्रस्तावाला आता मंजुरी मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
या Automated Driving Test Tracks मुळे ड्रायव्हिंग टेस्ट पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित होणार आहे. प्रत्येक चाचणीची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल आणि व्हिडिओ अॅनालिटिक्सच्या मदतीने स्टॉप लाईन ओलांडणे, सिग्नल चुकवणे किंवा असुरक्षित ड्रायव्हिंग यांसारख्या चुका त्वरित ओळखल्या जातील. पास किंवा नापास निकाल कोणत्याही अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलितपणे जाहीर केला जाईल.
याशिवाय अर्जदारांना त्यांच्या चाचणीचे रेकॉर्डिंग पाहण्याची सुविधा मिळणार आहे. निकालावर आक्षेप घेण्याची संधीही असेल. फेस रेकग्निशन तंत्रज्ञानामुळे बनावट उमेदवारांची समस्या देखील कमी होणार आहे.
राज्यातील RTO कार्यालयांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेत दलाल आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. मात्र या नवीन प्रणालीमुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि पुराव्यावर आधारित होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
हेही वाचा
