कमला मिलचा चौकशी अहवाल शुक्रवारी सादर होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कमला मिल कम्पाउंडमधील मोजो आणि वन अबव्ह पबमधील आग दुघर्टनेनंतर या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची उच्चस्तरीय चौकशी समिती गठित केली आहे. या चौकशी समितीचा अहवाल येत्या शुक्रवारपर्यंत पूर्ण करून मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे.

आयुक्त भूमिकेवर ठाम

कमल मिल कम्पाउंडमधील आगीची चौकशी महापालिका आयुक्त अजोय मेहता करत असल्यामुळे याला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. कमला मिलमधील बांधकामांना परवानगी देण्यात अजोय मेहता यांचाच प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे ही चौकशी निवृत्त न्यायाधिशांमार्फत केली जावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने केली जात आहे. मात्र, आयुक्त त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

सर्व बाजूंनी विरोध सुरु असला, तरी माझ्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकली आहे, त्याप्रमाणे ही चौकशी अजोय मेहता करत आहेत. ज्यावेळी मुख्यमंत्री सांगतील, तेव्हा ही चौकशी थांबवेन. परंतु, तोपर्यंत माझ्या चौकशीवर कोणताही परिणाम होणार नाही. येत्या शुक्रवारपर्यंत ही सर्व चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल.

अजोय मेहता, आयुक्त, मुंबई महानगर पालिका

आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी

कमला मिलमधील अनधिकृत बांधकामांबाबतच्या तक्रारी यापूर्वी केल्या होत्या. परंतु, महापालिकेने त्याकडे लक्ष दिले नाही, अशा प्रकारच्या तक्रारींचा पाढा आता सर्वच जण वाचत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कमला मिलमधील बांधकामांसंदर्भात ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी होत्या, त्या सर्वांना सोमवारी दुपारी आपल्या कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार काहींनी अजोय मेहता यांची भेट घेऊन तेथील अनधिकृत बांधकामांची माहिती दिली.

तक्रारी ऐकूनच अहवाल सादर करणार - आयुक्त

यासंदर्भात अजोय मेहता यांना विचारलं असता, त्यांनी "आपल्याला प्रत्यक्ष भेटून अथवा मेलद्वारे अनेक तक्रारी केल्या जात आहे. या सर्वांना सुनावणीसाठी सोमवारचा एक दिवस दिला असला, तरी तो पुरेसा नाही. आपण या सर्वांचे म्हणणे पुढील शुक्रवारपर्यंत ऐकून घेणार आहोत", असे सांगितले. तसेच, त्यांनी सुनावणीला बोलावलेल्या कुणाचेही नाव सांगण्यास नकार दिला. ही सर्व माहिती गोपनीय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा

कमला मिलमध्ये मृत्यूला जवळून पाहणारी माला कश्यप

पुढील बातमी
इतर बातम्या