९ वीच्या विद्यार्थ्यांचे टॅब गेले कुठे?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करून त्यांना टॅब देण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच वर्षांत या योजनेचा बोजवारा उडाला आहे. मागील वर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. हे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन नववीत आल्यानंतर त्यांना नववीचा अभ्यासक्रम टॅबमध्ये अपलोड करून द्यायला हवा होता. परंतु तसे न करता, नववीत गेलेल्या विद्यार्थ्यांकडील टॅब घेऊन ते आठवीत आलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या नववीतील विद्यार्थ्यांच्या हातातील टॅब गायब झाल्याची धक्कादायक बाब सपाचे गटनेते रईस शेख यांनी महापालिका सभागृहात उघडकीस आणली. महापालिकेच्या या अजब कारभारामुळे  टॅब योजनेचा फियास्को झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

एकच शिक्षक शिकवतो सर्व विषय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी महापालिका सभागृहात हरकतीच्या मुद्द्याद्वारे महापालिका शाळांमध्ये वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे साहित्य व शिक्षण पद्धती आदींबाबत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सईदा खान यांनी यावेळी यावर्षी शालेय मुलांना वाटप करण्यात आलेल्या दप्तरांसह काही वस्तूच दाखवून कशाप्रकारे तीन महिन्यांत त्या खराब झाल्या, याची माहितीच दिली. 

या माध्यमातूनच अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. एकच शिक्षक सर्व प्रकारचे विषय शिकवत आहे. त्यामुळे शिक्षक गैरहजर राहिला तर दुसरा कोणी शिक्षक शिकवायला येत नाही. असे असेल तर शिक्षणाचा दर्जा काय सुधारणार? असा सवाल करत या शिक्षण पद्धतीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याची खंत व्यक्त केली. यासाठी ठोस धोरण बनवण्याची मागणी त्यांनी केली.

प्रयत्न करूनही अपयश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी याला पाठिंबा देत शिक्षण विभागातील त्रुटींबाबत राष्ट्रवादी काँग्रेस वारंवार आवाज उठवत असल्याचे सांगितले. सईदा खान यांनीही या त्रुटींकडे लक्ष वेधत जी सूचना मांडली आहे, त्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. शाळांमध्ये गळती लागून पटसंख्या कमी होत आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी आपण प्रयत्नशीर आहात. परंतु त्यानंतरही जर आपल्याला अपयश येत असेल तर ही त्यापेक्षा गंभीर बाब असल्याचा टोला राखी जाधव यांनी महापौरांना मारला.

सविस्तर निवेदन करण्याचे आदेश

यावेळी सर्व नगरसेवकांनी महापालिका शाळांमधील दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत गुजराती माध्यमांच्या शिक्षकांना इंग्रजी शाळांमध्ये शिकवण्यास पाठवले जात असल्याची बाब मेहर हैदर यांनी मांडली. काही शाळांमध्ये मुलांना बाथरुम साफ करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप सुफियान वणू यांनी केला. 

अनेक शाळांना संगणक  दिले असले तरी त्यासाठी खोल्या नाहीत अशी तक्रार सुरेखा पाटील यांनी केली. तर आपल्या विभागातील शाळांमध्ये गळती लागलेली तर काहींच्या दरवाजे, खिडक्या तुटलेल्या असल्याची तक्रार शिवसेनेच्या नगरसेविका प्रियंका सावंत यांनी मांडली. यावेळी कप्तान मलिक, शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी चर्चेत भाग घेतला होता. यावेळी महापौरांनी याबाबतचे सविस्तर निवेदन सभागृहात करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

दर्जा सुधारण्यासाठी सर्वांनी पुढे यावे

महापालिका साडेतीन हजार शालेय मुलांना शिक्षण देत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षण देताना काही त्रुटी राहू शकतात. यामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वांनी सूचना करून त्यात बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी आवाहन केले. जर उणीवा दाखवून केवळ या शाळांवर टिका करणे योग्य नाही. महापालिकेने या शाळा बंद केल्यातर झोपडपट्टी, रस्त्यांवरील तसेच गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू शकतात, अशीही भीतीही व्यक्त केली.

शाळा नव्हे स्टडी सिटींग

परदेशात तसेच आपल्याकडेही नोकरदार आई-वडील आपल्या मुलांना बेबी सिटींगमध्ये सोडतात. तसेच आता महापालिका शाळांचे झाले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत नसतानाही गरीब नाईलाज म्हणून मुलांना महापालिका शाळांमध्ये दाखल करत असतात.

त्यामुळे महापालिका शाळा म्हणजे एकप्रकारे स्टडी सिटींग असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी साडेचार लाख मुलांची संख्या कमी होऊन साडेतीन लाखांच्या घरात आली आहे. त्याबद्दल प्रशासनाचे आणि सत्ताधारी पक्षाचे अभिनंदन करायचा का? असा चिमटाही त्यांनी शिवसेनेला काढला.


हेही वाचा -

सिग्नल शाळा...इथे उद्याचा भारत घडतो!

स्कूलबस तर आहे, पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय?

राज्याचा स्कूल सेफ्टी प्रोग्राम 'धोक्यात'


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या