झाडाच्या फांद्या कापण्यासाठी 'यांना' परवानगीची गरज नाही

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • सिविक

पावसाळ्यात झाडं काेसळण्याच्या, झाडाच्या फांद्या तुटण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. बेस्ट बस, लोकल, वीज वितरण कंपन्यांच्या वाहिन्यांंवर झाड कोसळून किंवा फांद्या तुटून एखादा अपघात होण्याची दाट शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनं मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, बेस्ट उपक्रम, मेट्रो, मोनोरेल, विमानतळ प्राधिकरण, महावितरण, टाटा पाॅवर आणि रिलायन्स एनर्जी अशा ९ यंत्रणां-संस्थांना त्यांच्या परिसरातील झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी दिली आहे. धोकादायक फांद्या छाटण्यासाठी संबंधित संस्थांना महापालिकेच्या परवानगीची गरज लागणार नसल्याची माहिती महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

पावसाळ्यात मोठा धोका

पावसाळ्याच्या अगोदर महापालिकेकडून झाडांच्या धोकादायक फांद्याची छाटणी केली जाते. पण इतर यंत्रणांना आपल्या सेवेमध्ये अडसर आणणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटायच्या असतील, तर महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी मिळाली नाही तर त्या फांद्या तशाच राहतात आणि पावसाळ्यात अशा फांद्या तुटून मोठी हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सेवा देणाऱ्या संस्थांना झाडांच्या फांद्याची छाटणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

झाडांना धोका पोहचू नये

ही छाटणी करताना संबंधित यंत्रणांना फांद्या छाटताना झाडांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहचणार नाही याची काळजी घेणं बंधनकारक असणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करतच त्यांना फांद्यांची छाटणी करावी लागणार आहे. सोबतच छाटणी पूर्वीचा आणि छाटणीनंतरचा झाडांचा फोटो महापालिकेकडे सादर करावा लागणार आहे. तसंच झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचा अहवाल तीन महिन्यांच्या आत सादर करणंही या यंत्रणांना बंधनकारक असल्याचं परदेशी यांनी स्पष्ट केलं.

३ वर्षांसाठी निर्णय

महापालिकेचा हा महत्त्वपूर्ण निर्णय पुढील ३ वर्षांसाठी लागू असणार असून केवळ ज्या फांद्यांमुळे अडचण निर्माण होत असेल त्याच फांद्या संबंधित यंत्रणांना छाटता येणार आहेत. तर फांद्या छाटल्यानंतर तो काही कचरा होईल त्याची विल्हेवाट त्या त्या यंत्रणांनाच लावावी लागणार आहे.


हेही वाचा-

मुंबई, तुला झाडांवर भरवसा नाय काय? वर्षाला 31 कोटी खर्च, तरीही पडझड!

खासगी जागेतील झाडे कापा, लोकांचा जीव वाचवा! नगरसेवकांची मागणी

महापालिकेचा हलगर्जीपणा? मृतांच्या नातेवाईकांना मिळणार ५ लाख


पुढील बातमी
इतर बातम्या