महापालिकेचा हलगर्जीपणा? मृतांच्या नातेवाईकांना मिळणार ५ लाख

नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे एखादी दुघर्टना घडून त्यात कुणाचा मृत्यू झाल्यास मृताच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला आहे.

SHARE

नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे एखादी दुघर्टना घडून त्यात कुणाचा मृत्यू झाल्यास मृताच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी शिवसेना आणि भाजपाच्या सदस्याने मागणी केली असून दोघांच्या मागणीची ठरावाची सूचना एकाचवेळी मंजूर करण्यात आली आहे. महापालिकेच्या इतिहासात एकाच विषयावर आणि एकाच मागणीसाठी दोन ठरावाच्या सूचना येणे आणि त्यांना मंजुरी मिळणं हे पहिल्यांदाच घडत आहे.


तुटपूंजी भरपाई

पावसाळ्यापूर्वी कंत्राटदारांमार्फत झाडांच्या फांद्यांची छाटणी केल्यानंतरही झाडं पडून लोकांचे जीव जात आहेत. अशाप्रकारे झाड पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृताच्या नातेवाईकांना १ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येते. तर जखमींना ५ हजार रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते.

परंतु ही रक्कम अपुरी असून महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून ५ लाख रुपये, तर जखमींना ५ हजारांऐवजी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका समृद्धी काते यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे सभागृहात मांडली होती. हा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला.समान विषय, दोन ठराव

मात्र, हा ठराव करण्यात आल्यानंतर भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनीही नैसर्गिक आपत्ती किंवा महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडलेल्या आपत्तीतील अपघातग्रस्तांना किंवा मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना महापालिकेच्यावतीने नुकसान भरपाई म्हणून ५ लाख रुपयांची मदत देण्याच्या मागणीचा ठराव मांडला.


ठरावाला आक्षेप

मात्र, या ठरावाला माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी तीव्र आक्षेप घेतला. एकाच मागणीचे दोन ठराव कशाप्रकारे मांडले जातात, असा सवाल करत त्यांनी चिटणीस खात्याला टार्गेट केलं. अशी मदत मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना मिळायला हवी. परंतु याबाबत एक ठराव मंजूर केलेला असताना तशाच प्रकारचा दुसरा ठराव मांडला जातो, हे कामकाजाला धरून नसल्याचं त्यांनी सांगितलं.


प्रशासनाचा अभिप्राय

यावर भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी सदस्यांनी ५ लाखांची मागणी केली असली तरी घटना वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे ही सुद्धा ठरावाची सूचना मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गंगाधरे यांनी मांडलेला ठराव मंजूर करून दोन्ही ठराव एकत्र करूनच प्रशासनाने अभिप्राय द्यावा, असा आदेश प्रशासनाला दिला.हेही वाचा-

चेंबूरमध्ये झाड अंगावर पडून महिलेचा मृत्यू

व्हायरल व्हिडिओ - झाड पडून महिलेचा मृत्यू


संबंधित विषय