मध्यान्ह भोजनासाठी मोक्याची जागा खाजगी संस्थेच्या घशात?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महापालिका शाळांमधील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषक आहार पुरवण्याच्या नावाखाली पवईतील तब्बल ३० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा अक्षय पात्रा या संस्थेच्या घशात घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या संस्थेला ही जागा देण्याचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत घेण्यात आला आहे.


सगळे काही 'अक्षयपात्रा'साठी

अक्षय पात्रा या संस्थेला मध्यान्ही भोजन पुरवण्यासाठी किचन बनवण्याकरता जागा देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेत मांडण्यात आला होता. हा भूखंड किचनसाठी नि:शुल्क देण्यात येणार आहे. सभागृहनेते यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे नमूद करत या संस्थेला मध्यान्ही भोजन बनवण्यासाठी ही जागा देण्यात येणार आहे.


प्रथम ५ हजार मुलांनाच पुरवठा

एकूण ५० हजार मुलांचे भोजन बनवण्यासाठी या जागेचा वापर केला जाणार आहे. प्रथम ५ हजार विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप केल्यानंतर टप्प्याटप्प्याने ते ५० हजार मुलांना पोषक आहाराचे वाटप करणार असल्याचे सांगितले. अशाप्रकारे जर अन्य संस्था पुढे आल्या तर त्यांनाही जागा उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


जाहिरात काढून वाटप

केवळ पाच हजार मुलांना पोषण आहार पुरवण्यासाठी ३० हजार चौरस फुटांची जागा देण्याचा हा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. पवईतील ही मोक्याच्या ठिकाणची जागा आहे. त्यामुळे पोषण आहाराच्या नावाखाली ही जागा या संस्थेच्या घशात घातली जात असून, जर अशा प्रकारे जागा द्यायची असेल, तर जाहिरात काढून त्याचे वाटप केले पाहिजे. परंतु तसे न करता ठराविक संस्थेला मदत करण्यासाठीच हा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप राजा यांनी केला. मात्र, ही जागा दिली जात असताना पहारेकऱ्यांनी मात्र बघ्याची भूमिका पार पाडल्याचा आरोप राजा यांनी केला.


मुंबईत ही एकमेव संस्था आहे का?

५ हजार मुलांचे भोजन बनवण्यासाठी ३० हजार चौरस फुटांची जागा देण्याची कल्पना आपल्याला मान्य नाही. संपूर्ण मुंबईत केवळ ही एकमेव संस्था आहे का? की कोणी महापालिकेकडे येत नाही? याचा खुलासा करण्याची मागणी आपण केल्याचे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे इतर संस्थांकडूनही अंदाज घेऊन हा  निर्णय घेतला जावा, घाईघाईत हा निर्णय घेऊ नये, अशी आपण सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा

1 हजार 414 हेक्टर वनजमीन गेली कुठे?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या