शिकाऊ डाॅक्टरांच्या पालघरमधील प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह?

मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये डाॅक्टरांची संख्या कमी असल्याने एका बाजूला रुग्णसेवेचा बोजवारा उडालेला अाहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डाॅक्टरांना मुंबईबाहेर सेवा देण्यास प्रवृत्त केलं जात आहे. मुंबईबाहेरील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणं राज्य सरकारची जबाबदारी असताना ही जबाबदारी महापालिका आपल्या खांद्यावर घेऊन मुंबईतील रुग्णांवर एकप्रकारे दुजाभाव करत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

मुंबईबाहेर रुग्णसेवा

'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रू. न. कूपर महापालिका सर्वोपचार रुग्णालय' येथील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा सुविधांच्या अनुषंगाने प्रशिक्षण मिळावं, याकरीता पालघर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील ३ आरोग्य केंद्रांसोबत संयुक्त कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्यासोबतच विद्यार्थ्यांना चांगला अनुभव मिळेल, अशी माहिती कूपर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी दिली.

कुठे देणार सेवा?

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागातील (Community Medicine Department) पदवी, पदव्युत्तर व इंटर्नशीप(आंतरवासीता प्रशिक्षण) करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पालघर जिल्ह्यातील कामन, केळवे व सातपाठी इथं पाठवण्यात येणार आहे. या तिन्ही ठिकाणी एकावेळी १६ विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करण्याची सोय उपलब्ध आहे. तसंच महापालिकेच्या परिचारीका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची सोय देखील याठिकाणी करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या तिन्ही ठिकाणी महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग(Pediatrics), स्त्रीरोग (Gynacology) व औषधशास्त्र (Medicine) विभागातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी गरजेनुसार निर्धारित दिवशी वैद्यकीय सेवा देणार आहेत. त्यामुळे या तिन्ही गावांच्या परिसरातील नागरिकांना मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन त्यांच्या गावातच मिळणार आहे. याबाबतचा कार्यक्रम नुकताच कामन येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात संपन्न झाला.

नियम काय सांगतो?

'मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया' च्या नियमांनुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणं किंवा अस्तित्वात असलेल्या आरोग्य केंद्रांची संलग्नता घेणं आवश्यक आहे.

नियमातून वगळा

मुंबई महापालिकेतर्फे ४ प्रमुख रुग्णालयाबरोबर १७ उपनगरीय रुग्णालय चालवली जातात. यामध्ये राज्यासह देशातील कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. महापालिकेच्या रुग्णालयातील गर्दी आणि त्यातुलनेत अपुऱ्या डॉक्टरांमुळे महापालिका रुग्णालयातील वैद्यकीय सेवेवर विपरीत परिणाम होत असल्याने मुंबई महापालिकेने 'मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया' कडे दाद मागून या नियमातून महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांना वगळण्याची मागणी होत आहे.


हेही वाचा-

केमोथेरपीशिवाय स्तनाचा कर्करोग होणार बरा

आरोग्यसेविकांचं आझाद मैदानात आंदोलन


पुढील बातमी
इतर बातम्या