पालिकेवर टीका करणाऱ्या आरजे मलिष्काला पालिका आयुक्तांनी दिली पावसाळ्यातील कामाची माहिती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दरवर्षी मुंबईत पावसाळ्यात जास्तीचा पाऊस झाला की मुंबईची तुंबई होते. अनेक भागांत पाणी साचल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल होतात. तसंच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं अपघाता होतात. यासर्व प्रकारावर 'आरजे' मलिष्कानं २ वर्षांपूर्वी 'मुंबै तुला बीएमसीवर भरवसा नाय काय!... गेली गेली मुंबई खड्ड्यात’, या गाण्यातून पालिकेवर टीका केली होती. मात्र, गुरुवारी आरजे मलिष्काला पालिका अधिकाऱ्यांनी उपदेशाचे डोस पाजले. पालिका दररोज सव्वा कोटी मुंबईकरांच्या नागरी सुविधांची कामे करते. ही कामे खूप मेहनतीची असून त्यामागे कामगारांचे अफाट कष्ट असतात. त्यामुळं आधी ही कामं समजून घ्या, नंतरच टीका करा, अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी मलिष्काला समज दिली.

लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशन

आरजे मलिष्का आणि अभिनेते अजिंक्य देव तसंच सहकारी यांनी वरळी येथील पालिकेचे लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशन आणि पालिका मुख्यालयातील आपत्कालिन कक्षाला गुरूवारी भेट दिली. यावेळी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, अश्विनी जोशी, आबासाहेब जर्हाड, उपआयुक्त अशोककुमार तवाडिया, उपआयुक्त अशोक खैरे, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प)विनोद चिठोरे, प्रमुख अभियंता श्रीकांत कावळे, सहायक आयुक्त यमगर, देवेंद्रकुमार जैन यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांनी पावसाळापूर्व कामांची माहिती दिली.

५ पम्पिंग स्टेशन सुरू

पावसाळ्यात पाणीउपसा करणारी ६पैकी ५ पम्पिंग स्टेशन सुरू करण्‍यात आली आहेत. तसंच उर्वरित एक केंद्र या पावसाळ्यात सुरू केलं जाणार आहे. यंदा २०० किमी लांबीच्या रस्‍त्‍यांची कामं पूर्ण करण्‍यात आली आहेत. खड्डे भरण्‍यासाठी कोल्‍डमिक्‍स तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करण्‍यात येणाऱ्या तलावक्षेत्रात पाऊस नसल्‍यानं जलसाठा जुलैअखेरपर्यंत पुरवण्‍याचं नियोजन असल्‍याची माहिती पालिका आयुक्तांनी मलिष्का व तिच्या सहकाऱ्यांना दिली. 'पावसाळ्यासाठी पाणी तुंबू नये यासाठी, पालिकेनं तयारी केली असून मुंबईकरांची गैरसोय होणार नाही. त्यामुळं पालिकेनं केलेली चांगली कामे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी मुंबईकरांपर्यंत पोहोचवावीत', असं आवाहन पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी केलं आहे.


हेही वाचा -

पश्चिम रेल्वेची तिसरी एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही ऑनलाइन परवानगी 


पुढील बातमी
इतर बातम्या