जकात उत्पन्न 350 कोटींनी वाढले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जुलै 1 पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आल्यामुळे महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणारा जकात कर बंद झाला. महापालिकेने तीन महिन्यांमध्ये 1500 कोटी रुपयांची करवसुली करण्याचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याला भेदत महापालिकेने तीन महिन्यांमध्ये 1890 कोटी रुपये वसूल केले आहेत. अपेक्षित उत्पन्नापेक्षा तब्बल 400 कोटी रुपयांचा अधिक महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.


कामगारांचे पुनर्वसन कुठे?

जकात कर रद्द होऊन शनिवारपासून जीएसटी कर लागू झाला. त्यामुळे मुलुंड, दहिसर, मानखुर्द, ऐरोली व वाशी आदी पाच जकात नाक्यांवर मध्यरात्रीपासून करवसुली बंद झाली. त्यामुळे या नाक्यावरील तब्बल 1300 कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांना या सर्व जकात नाक्यांवर बिनकामाशिवाय बसून राहावे लागले. या सर्व कर्मचारी, कामगार व अधिकाऱ्यांना कुठे सामावून घेतले जाणार आहे, याबाबत अद्यापही प्रशासनाकडून ठोस धोरण आखण्यात आले नाही. खुद्द करनिर्धारण व संकलन विभागाचे प्रमुख अधिकारी संजोग कबरे यांनी याबाबत सध्या कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले.


1500 कोटींचे होते टार्गेट

जीएसटी 1 जुलैपासून लागू करण्यात येणार असल्यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सन 2017-18चा अर्थसंकल्प मांडताना 1500 कोटी रुपयांचे उत्पन्न जकातीतून अपेक्षित असल्याचे सांगितले होते. या अपेक्षित उत्पन्नापेक्षा प्रत्यक्षात 30 जूनपर्यंत महापालिकेने 1890 कोटी रुपयांच्या जवळपास महसूल जकातीपासून वसूल केला असल्याची माहिती करनिर्धारण व संकलन विभागाचे प्रमुख अधिकारी संजोग कबरे यांनी दिली.


400 कोटी रुपये अधिक

मागील वर्षी जकातीपासून 6850 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. त्यातुलनेत मार्च 2017 पर्यंत महापालिकेने 7275 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. त्यामुळे मागील वर्षीही जकातीपासून सुमारे 400 कोटी रुपयांचा अधिक महसूल जमा झाला होता. त्याप्रमाणे तीन महिन्यांच्या टार्गेटमध्येही सुमारे 400 कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न जमा करण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.


हे देखील वाचा -

'त्यानं' ओलांडली जकातमुक्तीची वेस!

जकात कर्मचारी आता 'बिनकामाचे'


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 


पुढील बातमी
इतर बातम्या