जकात कर्मचारी आता 'बिनकामाचे'

  Mumbai
  जकात कर्मचारी आता 'बिनकामाचे'
  मुंबई  -  

  येत्या 1 जुलैपासून महापालिकेडून आकारला जाणारा जकात कर रद्द होऊन त्याजागी वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे. त्यामुळे जकात खात्यातील सुमारे 1300 कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हाताला कोणतेही काम राहणार नसून हे सर्व कर्मचारी बिनकामाचे ठरणार आहे. या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोणत्या खात्यात समावून घ्यायचे याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन महापालिका प्रशासनाने न केल्याने 3 जुलैनंतर या कर्मचाऱ्यांनी काय करायचे? हा मोठा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे आहे.


  मालमत्ता खात्यात पुनर्वसन

  महापालिकेच्या जकात खात्यात एकूण 1900 पदे असून त्यातील 1300 पदे कार्यरत आहेत. यांत 300 ते 350 कामगार वर्गातील पदे आहेत. त्यातील काहींना मालमत्ता विभागात सामावून घेतले जाईल. तर काहींना अन्य विभागांच्या गरजेनुसार इतर ठिकाणी सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे करनिर्धारण व संकलन विभागाचे प्रमुख अधिकारी संजोग कबरे यांनी स्पष्ट केले. जकातमधील काही कर्मचारी वर्ग हा निवडणूक विभागातही आहे. यापूर्वी जकात रद्द करून एलबीटी आणि त्यानंतर जीएसटी लागू होणार असल्यामुळे मागील 4 ते 5 वर्षांत या विभागात कर्मचाऱ्यांची भरतीच करण्यात आली नव्हती. त्यामुळे या विभागात सुमारे 600 पदे रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले.


  खासगी बस टर्मिनस

  जकात कर रद्द होत असल्यामुळे जकात नाक्यांची जागा खासगी बससाठी उपलब्ध करून देण्याची मागणी मुंबई बस मालक संघटनेने केली आहे. याबाबत खुद्द वाहतूक पोलिसांनी महापालिकेला पत्र लिहून आपले मत मागवले आहे. मात्र, या जकात नाक्यांच्या जागांचे काय करायचे? याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतेही धोरण निश्चित केलेले नाही.

  मुंबईत खासगी बस चालविणाऱ्यांसाठी पार्किंगकरीता जागा उपलब्ध नसल्यामुळे वाहने उभे करण्यास मोठी अडचण निर्माण होते. जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईत जकात नाक्यांची जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही जागा खासगी बस मालकांना दिल्यास वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मुंबई बसमालक संघटनेने म्हटले आहे. याबाबत करनिर्धारण व संकलन विभागाचे प्रमुख अधिकारी संजोग कबरे यांना विचारले असता, त्यांनी यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले.


  जकात नाक्यांवर संरक्षण भिंती

  जकात नाके बंद करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी सर्व नाक्यांच्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे त्यामुळे तिथे कोणतेही अतिक्रमण होणार नाही. परंतु याबरोबरच जुने काही रेकॉर्ड असल्यामुळे आपला कर्मचारी वर्गही तिथे तैनात करण्यात येणार असल्याचे कबरे यांनी म्हटले आहे.


  हे वाचा -  बेस्टप्रमाणे महापालिकेलाही शिवसेना खड्ड्यात घालणार!

  हे देखील वाचा - असा होईल ‘जीएसटी’चा घरखर्चावर परिणाम


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.