'त्यानं' ओलांडली जकातमुक्तीची वेस!

Mumbai  -  

मुंबईचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या मुलुंड, दहिसर, मानखुर्द, ऐरोली, वाशी या पाच मुख्य जकात नाक्यांवर शुक्रवारी दिवसभर वर्दळ होती. पण रात्री बाराची वेळ जवळ येऊ लागताच इथल्या कर्मचाऱ्यांसोबत जकात नाक्याच्या कडेला टेम्पो, ट्रक, ट्रेलर लावून कित्येक तास ताटकळत उभे असलेल्या वाहन चालकांमधील अस्वस्थताही वाढायला लागली.अखेर तो क्षण आलाच...घडाळ्याने बाराचा ठोका देताच पाठीवर शेकडो टन सामान लादूनही इथल्या जड-अवजड वाहनांनी मुक्त पाखराप्रमाणे मुंबईच्या रस्त्यांवर झेप घेत जकातमुक्तीचा आनंद व्यक्त केला.दहिसर नाक्यावर शेवटचा जकात कर भरलेला वाहन चालक ही पावती ऐतिहासिक दस्तावेजाप्रमाणे न्याहाळत होता. हे जकातनाके आणि इथले कर्मचारी यापुढे कुठल्याही वाहनाची वाट अडवू शकणार नाहीत, याची साक्ष ही शेवटची पावतीच जणू त्याला देत असावी.तर, याच नाक्यावरून जकात कर न भरता मुंबईत दाखल झालेल्या पहिल्या वाहन चालकाच्या चेहऱ्यावरील आनंदही अवर्णनीय होता.रेकॉर्डब्रेक वसुली

एप्रिल ते जून या तीन महिन्यांत प्रशासनाने दीड हजार कोटी रुपये जकात वसुलीतून जमवण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते. परंतु, ही जकात वसुली 1821 कोटी रुपयांच्या पुढे गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading Comments