सफाई कामगारांच्या संपामुळे मुंबईकरांची कचराकोंडी?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेने शहरभरातील कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचवण्याचं काम संपूर्णपणे कंत्राटदाराकडे सोवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे महापालिकेच्या सेवेतील कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगार संतापले आहेत. या कामगारांनी शुक्रवारपासून महापालिकेच्या २४ विभागांमध्ये कामबंद आंदोलन सुरू केलं असून या संपावर तोडगा न निघाल्यास मुंबईकरांची कचराकोंडी होण्याची शक्यता आहे.

कामगारांचं भवितव्य दावणीला

महापालिकेच्या निर्णयानुसार बुधवारपासून शहरातील कचरा उचलणे आणि साफसफाईची जबाबदारी कंत्राटदारावर सोपवण्यात आली. यामुळे एका बाजूला महापालिकेत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर दुसऱ्या बाजूला कायमस्वरुपी सफाई कामगारांना अन्य विभागांमध्ये सामावून घेण्यात येणार आहे.

संपाचा निर्णय

त्यामुळे नाराज झालेल्या कंत्राटी कामगारांनी बुधवारपासूनच बोरिवली, दहिसरमध्ये कामबंद आंदोलन करून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. महापालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांवरील अन्याय दूर न केल्यास शुक्रवारपासून मुंबईत कुठेही कचरा उचलणार नाही, असा इशारा कामगार संघटनांच्या बैठकीत देण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारपासून हे आंदोलन सुरू करण्यात आलं. या आंदोलनाला कायमस्वरूपी कामगारांनीही साथ दिली आहे.

महापालिका प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने तोडगा न काढल्यास मुंबईतील साफसफाईचा प्रश्न गंभीर रूप धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


हेही वाचा- 

रविवारी १७० फेऱ्या होणार रद्द, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक

मुंबईकरांवर पाणीसंकट, आजपासून १० टक्के पाणीकपात


पुढील बातमी
इतर बातम्या