राज्यात प्लॅस्टिक बंदी, पण महापालिकेला अद्याप परीपत्रकच नाही!

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मुंबईसह राज्यात प्लॅस्टिक पिशव्यांसह बॉटल्सवरही बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात मुंबई महापालिकेने अद्यापही आपले धोरण स्पष्ट केलेले नाही. राज्य सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीबाबत जारी केलेल्या परिपत्रकाची प्रत अद्यापही महापालिकेला प्राप्त न झाल्यामुळे सध्या तरी प्लॅस्टिक पिशव्यांवरील कारवाईबाबत ठोस भूमिका जाहीर केली जाणार नाही. मात्र, प्लॅस्टिक पिशव्यांवर महापालिकेकडून जी कारवाई सुरु आहे, ती मात्र सुरु राहील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पालिकेने घेतला फक्त आढावा!

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तापासून प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आणून याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई सुरु झालेली नाही. याबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्त(विशेष) निधी चौधरी यांच्यासोबत बैठक घेऊन या कारवाईचा आढावा घेतल्याचे समजते.

पालिकेची कारवाई चालूच राहील

याबाबत उपायुक्त(विशेष) निधी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाच्या परिपत्रकाबाबत आयुक्तांनी चर्चा केल्याचे सांगितले. प्लॅस्टिक बंदीबाबत शासनाचे कोणतेही परिपत्रक अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्या परिपत्रकाची वाट पाहत असून ते प्राप्त झाल्यानंतरच याबाबत धोरणात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, महापालिकेकडून याआधीपासून प्लॅस्टिक पिशव्यांवरील कारवाई ज्याप्रमाणे चालू आहे, तशीच चालू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा

प्लॅस्टिक आवळत आहे मुंबईचा गळा...

पुढील बातमी
इतर बातम्या