'मिठी'तलं पाणी होणार स्वच्छ! प्रक्रिया करून नदीत सोडणार

मिठी नदीतील पाणी स्वच्छ करण्याच्या पहिल्या टप्प्यात नदीच्या उगमापासून अर्थातच 'फिल्टरपाडा' परिसर ते 'डब्ल्यूएसपी कम्पाऊंड' पर्यंतच्या १ हजार ६५० मीटर लांबीच्या नदीतील पाण्यावर जल प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी आवश्यक असणारे प्रक्रिया केंद्र (STP) ‘डब्ल्यूएसपी कम्पाऊंड’जवळ उभारण्यात येणार आहे. या प्रक्रिया केंद्राद्वारे मिठी नदीतील ८० लाख लीटर पाण्यावर दररोज प्रक्रिया करुन स्वच्छ झालेले पाणी पुन्हा नदीत सोडण्यात येणार आहे.

प्रक्रियेचे चार टप्पे

मिठी नदीतील पाणी अधिक स्वच्छ करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वस्तरीय प्रयत्न सुरु केले आहेत. हे प्रयत्न प्रामुख्याने चार टप्प्यामंध्ये विभागण्यात आले आहेत. मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर एवढी आहे.यापैकी ११.८४ किमी लांबीची नदी ही महापालिकेच्या अखत्यारितील भागात असून उर्वरित ६ किमी लांबीची नदी ही 'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' यांच्या अखत्यारित येते. या नदीचे पाणलोट क्षेत्र (Catchment Area) हे साधारणपणे ७ हजार २९५ हेक्टर एवढे आहे. पहिल्या टप्प्यात मिठी नदीच्या उगमापासून १ हजार ६५० मीटर अंतरावर जल प्रक्रिया केंद्र (STP)उभारण्याची निविदा प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली आहे.

१२० कोटींचा खर्च

हे केंद्र उभारण्यासाठी सुमारे १२० कोटी रुपये एवढा खर्च अंदाजित आहे. या केंद्राद्वारे दररोज सुमारे ८० लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया करुन ते मिठी नदीच्या प्रवाहात सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर मिठी नदीच्या पात्राच्या जवळपासच्या परिसरातील सांडपाणी व मलजल वाहून नेण्यासाठी अधिक सक्षम व्यवस्था तयार करण्याची प्रक्रिया देखील महापालिकेच्या संबंधित खात्यांद्वारे करण्यात येणार आहे, जेणेकरुन मिठी नदी अधिकाधिक स्वच्छ राहण्यास मदत होईल, अशी माहिती मुंबई मलनिःसारण प्रकल्पाचे प्रमुख अभियंता महेश ठाकूर यांनी दिली आहे.

आयुक्तांकडून मंजुरी

यानुसार मिठी नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठीच्या पहिल्या टप्प्यास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नुकतीच प्रशासकीय मंजूरी दिली असून उर्वरित तीन टप्प्यांना देखील तत्वत: प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील १ हजार ६५० मीटरचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्यापुढील ६ किलोमीटर लांबीच्या नदीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या अंतर्गत मलजल व सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे जाळे उभारण्यासोबतच २ उदंचन केंद्रे (Pumping Station) देखील उभारण्यात येणार आहे.

म्हणून मिठी प्रदूषित

मिठी नदीचा उगम असलेल्या फिल्टर पाडा येथे रेडीमिक्स सिमेंट प्लांट (आरएमसी ) बसवण्यात आला असून हे सिमेंट मिश्रित प्रदूषित पाणी नदीत सोडले जात असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. त्यामुळे या आरएमसी प्लांटवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्लांटमधून बाहेरील ठिकाणी हे सिमेंट मिक्स वापरुन व्यवसाय केला जात असल्याचे सांगत त्यांनी मुंबईत सुरु असलेल्या सर्व आरएमसी प्लांटची माहिती देण्याची तसेच त्याच्या वापरासंदर्भात एकच धोरण बनवण्याची मागणी केली आहे.

नदीच्या सफाईचे प्रस्ताव मंजूर

सिएसटी पूल ते कुर्ला ते फिल्टरपाडा आणि प्रेमनगर, बीकेसी ते कुर्ला सीएसटी पूल या दोन भागातील मिठी नदीच्या सफाईचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. मिठी नदीच्या या दोन्ही प्रस्तावांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

या दोन्ही भागांसाठी अनुक्रम जे. आर. एस. इन्फास्ट्रक्चर्स आणि एम. बी. ब्रदर्स या कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या दोन्हींसाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. मिठी नदीच्या सफाईचे प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात मंजूर होण्याचे प्रथमच घडत असून त्यामुळे नियमित वेळेवर याची सफाई केली जाणार आहे.

हेही वाचा-

बामनदायापाडातील मिठी नदीवरील २७० अनधिकृत बांधकामांवर कारवाई

मिठी नदीच्या सफाईऐवजी भराव, कंत्राटदाराची हातचलाखी 'या' नगरसेवकानं पकडली

पुढील बातमी
इतर बातम्या