Advertisement

मिठी नदीच्या सफाईऐवजी भराव, कंत्राटदाराची हातचलाखी 'या' नगरसेवकानं पकडली


मिठी नदीच्या सफाईऐवजी भराव, कंत्राटदाराची हातचलाखी 'या' नगरसेवकानं पकडली
SHARES

प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या मिठी नदीच्या सफाईसाठी महापालिकेनं मागील मार्च महिन्यात कंत्राटदाराची नेमणूक केली. पण या कंत्राटदारांनी मिठी नदीची सफाई करण्याऐवजी पात्रात ड्रेब्रिजचा भराव टाकण्यास सुरूवात केली. ही बाब जी-उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कंत्राटदारांची वाहने जप्त करण्याची सूचना पोलिसांना केली आहे.   


मिठीच्या पात्रात दगडविटांचा भराव

माहीम पश्चिम येथील पोलीस वसाहत आणि मच्छीमार वसाहतीच्या मागून मिठीनदीचं पात्र जात असून या मिठीच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने कंत्राटदाराची नेमणूक केली. पण मागील तीन दिवसांपासून पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक ७, ८ आणि ९ या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या मिठीच्या पात्रात दगडविटांचा तसेच मातीचा भराव टाकला जात आहे.


पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सफाईऐवजी भराव टाकला जात असल्यामुळे स्थानिक शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी या कंत्राटदाराकडे विचारणा केली असता, त्यांनी या नदीत रॅम्प बनवण्यासाठी हा भराव टाकला जात असल्याचं सांगितलं. मात्र, सफाई ऐवजी तिवरांच्या झाडांवर भराव टाकून झाडं मारण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे या सर्व वाहनांच्या चाव्या काढून घेत सर्व कामगारांविरोधात वैद्य यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


सफाईच होत नाही, मग रॅम्प कशासाठी?

महापालिकेनं नालेसफाई आणि मिठी नदीच्या सफाईसाठी नव्याने निविदा काढण्याच काम सुरू केलं आहे. मिठी नदीची सफाई ही एप्रिल-मेमध्ये केली जाते. त्यामुळे आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अशाप्रकारे कुठलीही सफाई नाही. त्यामुळे आम्हाला शंका आली. म्हणून यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी हे कंत्राट मुकेश कंन्स्ट्रक्शन कंपनीकडे असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्यांच्याकडे कामाच्या कार्यादेशाची प्रत मागितली असता, त्यांनी जुन्या कंत्राटाची प्रत दाखवली. पण याबाबत महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या उपप्रमुख अभियंत्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी आपल्याला याची कल्पना नसल्याचं सांगितलं. त्यामुळे कुठल्याही प्रकारची सफाई नसताना आता रॅम्प कशासाठी बनवला जातो, असा प्रश्न वैद्य यांनी निर्माण केला आहे.

हा भराव नदीच्या पात्रात टाकताना तिवरांच्या झाडांवर टाकला जात आहे. यामध्ये तिवरांची झाडे मरत असल्यामुळे याविरोधात आपण माहीम पोलीस ठाण्यात संबंधित कंत्राट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करत असल्याचं वैद्य यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा