गेट वे ऑफ इंडिया परिसरात पहिलं ई-टॉयलेट

गेट वे ऑफ इंडिया परिसरात फक्त मुंबईच नव्हे तर राज्यभरातून तसंच देश-विदेशातूनही पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. परंतु या ठिकाणी शौचालयाची कमतरता असल्यानं पर्यटकांची  गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी गेट वे परिसरात अत्याधुनिक यंत्रणा असलेलं ई-टॉयलेट सुरू करण्यात येणार आहे. अतिशय स्वच्छ, सुंदर आणि अत्याधुनिक यंत्रणा असलेलं मुंबईतील हे पहिलं ई-टॉयलेट अाहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून हे टॉयलेट सुरू करण्यात येणार आहे.

सध्या परिस्थिती काय?

गेट वे ऑफ इंडिया परिसरात फक्त एकच सुलभ शौचालय आहे. त्यात महिलांसाठी ३ टॉयलेट सीट अाणि पुरूषांसाठी फक्त २ टॉयलेट सीट आहेत. त्यामुळं सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवारी, रविवारी या सुलभ शौचालयासमोर पर्यटकांची गर्दी होते. या गर्दीमुळं अनेकदा  काही पर्यटक, लहान मुलं,  टॅक्सीचालक, खासगी ड्रायव्हर उघड्यावर टॉयलेटला जातात. परिणामी या परिसरात दुर्गंधीचं वातावरण व अस्वच्छता पसरते. यामुळं या परिसरात शौचालयाची संख्या वाढवण्याची मागणी अनेक पर्यटकांनी केली होती.

असं असेल टॉयलेट

गेट ऑफ इंडिया परिसरातील रेडिओ क्लबजवळ हे टॉयलेट उभारण्यात आलं आहे. सध्या या ठिकाणी तीन टॉयलेट बसवण्यात आले असून त्यात अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. या टॉयलेटचा वापर करण्यासाठी बॉक्समध्ये पाच रूपयाचा नाणं टाकावं लागेल. त्यानंतर टॉयलेटचा दरवाजा उघडेल. या टॉयलेटचा वापर करण्याच्या सुरूवातीला अॉटोमेटिक पद्धतीनं फ्लश होईल. त्यानंतर एखाद्या व्यक्तीनं टॉयलेटचा वापर केल्यानंतर फ्लश होईल.

फ्लशिंग सिस्टीम स्वयंचलित

अशाप्रकारे प्रत्येक दोन वेळा हे ऑटोमेटिक पद्धतीनं फ्लश होणार आहे. फ्लशिंग सिस्टीम पूर्णपणे स्वयंचलित असणार आहे. त्यानंतर प्रत्येकी पाच व्यक्तींनी या टॉयलेटचा वापर केल्यानंतर संपूर्ण फ्लोअरही स्वच्छ होणार आहे. या तिन्ही टॉयलेटचा वापर महिला, पुरूष, लहान मुल, वृद्ध यांसह इतरांनाही करता येणार आहे. विशेष म्हणजे एखादा व्यक्ती टॉयलेटचा वापर करत असताना दुसऱ्या व्यक्तीसाठी एक इंडिकेशनही बसवण्यात आलं आहे. या ई-टॉयलेटचे संपूर्ण ऑपरेटिंग आणि मेंटेनन्स लायन्स क्लबच्या माध्यमातून केलं जाणार आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटक, वाहन चालकांमधील अनेकजण उघड्यावर टॉयलेटला जातात. यामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता पसरते. त्यामुळे या ठिकाणी ई-टॉयलेट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय हे ई-टॉयलेट युनिसेक्स असल्यानं फक्त पाच रूपयांमध्ये या ठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुविधा मिळणार आहे. त्याशिवाय स्वच्छताही राखली जाणार आहे

 -किरण दिघावकर,  सहाय्यक आयुक्त, ए विभाग


हेही वाचा -

दिवाळीत एसटीची १० टक्के भाडेवाढ

'महालक्ष्मी जत्रे'साठी बेस्टच्या जादा बस


पुढील बातमी
इतर बातम्या