शिवसेनेच्या 'वचनपूर्ती'चा महापालिकेच्या तिजोरीवर भार?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शिवसेनेची 'वचनपूर्ती' करण्यासाठी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत बसपास देताना महापालिकेच्या तिजोरीवर तब्बल १६५ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. विशेष म्हणजे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १ किमी बस प्रवास गृहीत धरून हा पास दिला जाणार अाहे. या पासचा फायदा ३ लाख ३१ हजार ७५५ शालेय विद्यार्थ्यांना होणार आहे.

निधी बेस्टच्या तिजोरीत?

तर, दुसऱ्या बाजूला ही योजना विद्यार्थ्यांना जाहीर झालेली असली, तरी बहुतांश विद्यार्थी बसने प्रवास करण्याची शक्यता नसल्याने महापालिकेचा हा निधी बेस्टच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

योजना का?

शिवसेनेने निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचननाम्यातील घोषणेनुसार महापालिका शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना बेस्टचा मोफत बसपास देण्याची योजना महापालिका राबवत आहे. या मोफत बसपासचे शुल्क महापालिका बेस्टला देणार आहे.

कुणाला फायदा?

महापालिकेच्या १०४८ प्राथमिक शाळा तसेच १४७ माध्यमिक शाळांमधील एकूण ३ लाख ३१ हजार ७५५ विद्यार्थी या मोफत बसपाससाठी लाभार्थी असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. घराजवळील बस स्थानकापासून ते शाळेजवळील बस स्थानकापर्यंत मोफत बसपासचा लाभ विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत मिळणार आहे.

किती खर्च?

चालू आर्थिक वर्षाला १६४ कोटी ७७ लाख ९६ हजार ८०० एवढा खर्च करण्यात येणार आहे. यांत प्राथमिक शाळेच्या मुलांसाठी १३४.७७ कोटी, तर माध्यमिक शाळांमधील मुलांच्या बसपासवर ३० कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव बेस्ट आणि महापालिकेच्या लेखा विभागाने बनवला आहे.


हेही वाचा-

पुढचं वर्ष बेस्ट भाडेवाढीचं? 1 ते 12 रुपयांपर्यंतची वाढ?

इलेक्ट्रीक बसचे ७ 'बेस्ट' फायदे


पुढील बातमी
इतर बातम्या