पुढचं वर्ष बेस्ट भाडेवाढीचं? 1 ते 12 रुपयांपर्यंतची वाढ?


SHARE

बेस्टच्या प्रस्तावित, 2018-2019 च्या भाडेवाढीला मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, पुढच्या वर्षी तुमचा बेस्टचा प्रवास महागणार आहे. प्रस्तावित भाडेवाढीनुसार 6 किमीपर्यंतच्या भाड्यात कोणतीही वाढ होणार नसून हे भाडे 8 रुपये इतकेच राहणार आहे. पण त्यापुढे 6 किमीनंतरच्या प्रत्येक किलोमीटरच्या प्रवासासाठी बेस्ट प्रवाशांना 1 ते 2 रुपये मोजावे लागणार आहे. तर ही भाडेवाढ 1 ते 12 रुपयापर्यंतची असणार आहे.


सभागृहात मान्यतेनंतर भाडेवाढ होणार लागू

मंगळवारी प्रस्तावित बेस्ट भाडेवाढीला बेस्ट समितीने मंजुरी दिली असली, तरी मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही भाडेवाढ लागू होणार असल्याची माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिली आहे.

प्रस्तावित भाडेवाढीचा प्रवाशांवर भुर्दंड पडू नये, यासाठी पहिल्या 6 किमीपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नसल्याने यापुढेही बेस्टचे किमान भाडे 8 रुपये इतकेच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 6 किमीनंतरच्या प्रवासासाठी मात्र 1 ते 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिथे 14 रुपये प्रवाशांना मोजावे लागतात, तिथे यापुढे 15 ते 16 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.


पासही महागणार

प्रस्तावित भाडेवाढीनुसार बेस्टच्या तिकिटांबरोबरच बेस्टच्या पासच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार दैनंदिन पास, मासिक पास, त्रैमासिक पास आणि वार्षिक पास यामध्येही वाढ होणार असून ही वाढ 40 ते 350 रुपये इतकी असणार आहे. त्यामुळे पासधारक प्रवाशांच्या खिशालाही यापुढे कात्री बसणार आहे.हेही वाचा

मुंबईत धावणार इलेक्ट्रिक बसगाड्या


संबंधित विषय
ताज्या बातम्या