पावसाळ्यात मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास अनेक सखल भागात पाणी साचतं. गुडघाभर पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक (Road Transport) विस्कळीत होते. मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणी म्हणजे अंधेरी, मालाडा, वांद्रे, हिंदमाता, लालबाग, परळ या ठिकाणी प्रचंड पाणी साचतं. त्यामुळं आता या उपाययोजना करून या परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिका (BMC) सज्ज झाली आहे. महापालिकेकडून काही दिवसांपूर्वीचं पावसाळ्यापूर्वीच्या कामाला सुरूवात झाली. त्यातच आता अंधेरी पश्चिम येथील नाल्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून यासाठी तब्बल १७ कोटी ६१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
अंधेरी (Andheri) पश्चिम येथील नाल्यांच्या दुरूस्तीसाठी निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसंच, कामाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यामुळं पावसाच्या पाण्याचा त्वरीत निचरा होऊन अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. अंधेरी पश्चिम एसव्ही रोडलगत असलेला अंधेरी सबवे, अंधेरी मार्केट व अन्य ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते.
या कामामध्ये चित्रलेखा नालासह सलामिया नाला आदींसह अन्य पर्जन्यजलवाहिन्यांचा समावेश आहे. याबाबतच्या शेकडो तक्रारी पालिका विभाग कार्यालयासह आयुक्तांकडे आल्या होत्या. त्यानुसार येथील भागाची पाहणी करून पालिकेने एक अहवाल तयार केला आहे. यात या भागातील अरुंद नाले, नाल्याच्या पडलेल्या भिंती यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळं हे पाणी अंधेरीच्या सखल भागात घुसते.
यंदा पावसाळ्यापूर्वी येथील नाल्यांची रुंदी वाढवण्यासह नाल्यांचं खोलीकरण व पडलेल्या भिंती आरसीसी पद्धतीनं बांधण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. या कामासाठी महापालिकेनं २१ कोटी १२ लाख रुपयाचा खर्च अपेक्षित होता. मात्र, कंत्राटदारानं प्रत्यक्षात १६.६० टक्के कमी दरानं निविदा भरली. त्यामुळं महापालिकेचे तब्बल ४ कोटींहून अधिक पैसे वाचणार आहेत.
नाल्यांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी दिल्यानंतर कामाचं लेखी आदेश देण्यात येणार आहे. या कामात कंत्राटदाराला नाल्यातील अडथळे दूर करण्यासह आतील गाळ काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हे काम पावसाळ्यासह १८ महिन्यांत पूर्ण करण्याची कंत्राटदाला (Contracter) मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सन २०२१च्या पावसाळ्यापर्यंत येथील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचा दावा महापालिकेच्या पर्जन्यजलवाहिनी विभागानं (Municipal Rainfall Waterways Department) केला आहे.
हेही वाचा -
भाऊचा धक्का ते मांडवा 'रो पॅक्स फेरी' सेवा लवकरच होणार सुरु
मध्य रेल्वेचे सीएसएमटी पहिलं 'इट राइट स्टेशन'