नाल्यांमध्ये कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई- महापालिका आयुक्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पावासाळ्यापूर्वी नाल्यांच्या सफाईसाठी महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करते. मात्र, अनेक परिसरातील रहिवाशी नाल्यांमध्ये बेजबाबदारपणे कचरा टाकतात. यामुळं नाल्यामध्ये कचऱ्याचे ढीग साचून परिसरात पाणी तुंबतं. त्यामुळं या प्रकार घडू नये यासाठी नाल्यामध्ये कचरा टाकताना आढळल्यास त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दंडात्मक कारवाई केल्यनंतर देखील कचरा टाकताना आढळल्यास उपाय म्हणून संबंधित परिसराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला आहे. मंगळवारी महापालिका आयुक्तांनी  पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी  बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

नाल्यांची सफाई

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मोठे नाले, छोटे नाले व रस्त्यालगतच्या गटारांची सफाईची कामं केली जातात. परंतु, नाल्याभोवती वसलेल्या झोपड्या, निवासी संकुलांतून कचरा नाल्यात टाकला जातो. त्यामुळं पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ व कचरा काढल्यानंतरही कचऱ्याचे ढीग नाल्यात दिसून येत असून पाणी तुंबण्याचे प्रकारही घडतात. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी आयुक्तांनी अशा ठिकाणी कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

फ्लोटिंग ब्रूम

नालेसफाईची कामे निर्धारित वेळापत्रकानुसार करावीत, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसंच, आवश्यकता भासल्यास या कामी कर्मचारी वर्ग वाढवावा. साफसफाई करण्यात आलेल्या नाल्यांमध्ये काही परिसरात कचरा टाकला जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. या परिसरातून वाहणाऱ्या नाल्याच्या कडेला 'जाळी' व कचरा अडवणारे 'फ्लोटिंग ब्रूम' बसवावेत. परिसरातील लोकांना कचरा न टाकण्याबाबत विनंती करावी. तसेच या कामी स्थानिक नगरसेवकांची मदत घेऊन जनजागृती करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा -

जेटच्या कर्मचाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तोडगा काढण्याचं आश्वासन

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या