महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! मिळणार ‘इतक्या’ रुपयांचा बोनस

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मागील काही दिवसांपासून दिवाळी बोनसच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबई महापालिका (bmc employees) कर्मचाऱ्यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुड न्यूज दिली आहे. महापालिकेच्या सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना यावर्षी १५,५०० रुपये सानुग्रह अनुदान (bonus) देण्याची घोषणा महापौरांनी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ५०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

मुंबई महापालिकेतील विविध विभागांकडे १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनामुळे (coronavirus) महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या.

दि म्युनिसिपल युनियनने महापालिकेच्या (bmc) सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना २०१९-२०च्या वर्षातील उत्पन्नाच्या २० टक्के इतका बोनस देण्याची मागणी केली होती,तर, म्युनिसिपल मजदूर संघाने कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली होती. दोन्ही संघटनांच्या प्रस्तावावर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर (mayor kishori pednekar) आणि संघटनांचे प्रतिनिधी यांनी बैठक घेतली होती. (bmc workers will get bonus for diwali festival)

हेही वाचा- मुंबईतील ४३ हजार इमारती टाळेबंदीतून मुक्त

या बैठकीतून मध्यम मार्ग काढत महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५००, अनुदानप्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७७५०, मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना ४७०० आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षणांना २३५० रुपये बोनस देण्याचं ठरवण्यात आलं आहे. त्याचबरोबर सामाजिक आरोग्य स्वयंसेविका यांना भाऊबीजेची भेट म्हणून ४ हजार ४०० रुपये देखील देण्यात येणार आहेत.

महापालिकेची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसली तरी कोरोना संकटाच्या काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांना अधिकाधिक बोनस मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केल्याचं, महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

सानुग्रह अनुदानाच्या या घोषणेमुळे महापालिकेच्या तिजोरीवर १५५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

हेही वाचा- मध्य व पश्चिम मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या