बेकायदेशीर होर्डिंग लावणं नगरसेवकाच्या अंगलट; न्यायालयाकडून २४ लाखांचा दंड

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आपल्याच वॉर्डात बेकायदेशीररित्या होर्डिंग लावण्याचं प्रकरण भाजपच्या नगरसेवकाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना २४ लाखांचा दंड ठोठावला असून ही रक्कम २ महिन्यांच्या आत महापालिकेकडे नुकसान भरपाई म्हणून जमा करावी लागणार आहे.

नगरसेवकाकडून मारहाण

मुरजी पटेल असं या नगरसेवकाचं नाव आहे. पटेल अंधेरीतील वाॅर्ड क्र. ८१ येथील नगरसेवक आहेत. त्यांनी लावलेलं होर्डिंग काढण्यास आलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनाही त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. हीच मारहाण त्यांना चांगलीच महागात पडली आहे. न्यायालयात पटेल यांनी या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत आपला बिनशर्त माफीनामाही सादर केला होता. तसंच यापुढे बेकायदेशीर होर्डिंग लावण्यात येणार नसल्याचंही त्यांनी लेखी आश्वासन न्यायालयाला दिलं.

होर्डिंगची माहिती द्या

न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला असून त्यांना आपल्या वॉर्डमध्ये फिरून शाळा, मैदानं, रूग्णालय परिसरात लावण्यात आलेली बेकायदेशीर होर्डिंग शोधून त्याची रितसर तक्रारही पटेल यांना करण्यास सांगितलं आहे. तसंच दोन महिन्यानंतर या तक्रारींची माहितीही त्यांना पालिकेला द्यावी लागणार आहे. राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंगविरोधात सुस्वराज्य फाऊंडेशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

पटेल यांनी बेकायदेशीररित्या लावलेल्या होर्डिंगची माहिती महापालिकेला मिळाली होती. त्यानंतर महापालिकेचं पथक या ठिकाणी कारवाईसाठी पोहोचलं. पालिका अधिकारी हे होर्डिंग काढत असताना पटेल यांचे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड शिवीगाळ करत पालिका कर्मचाऱ्यांना मारहाणही केली असल्याचं महापालिकेने अवमान याचिकेद्वारे हायकोर्टाच्या निदर्शनास आणले. तसेच यासंदर्भातील फोटोही पुरावा म्हणून दाखल केले होतं.


हेही वाचा -

महापालिकेच्या शिक्षकांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण

पगार वेळेत मिळत नसल्याने हैराण, बेस्ट कामगार साधणार मुंबईकरांशी संवाद


पुढील बातमी
इतर बातम्या