नवी मुंबईत परवानगीशिवाय वृक्षतोड केल्यास थेट गुन्हा दाखल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबईत आता परवानगी शिवाय वृक्षतोड केल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे. वृक्ष आणि पर्यावरण संरक्षणासाठी विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.  

यामुळे आता अत्यावश्यक कारणासाठी जरी एखादे झाड तोडणे गरजेचे असले अथवा वृक्ष छाटणी करावयाची असेल तरी त्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असेल

अनेकदा अशाप्रकारची परवानगी न घेताच वृक्ष तोड करणे अथवा वृक्ष छाटणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशाप्रकारे विनापरवानगी वृक्षतोड/ वृक्षछाटणी करुन पर्यावरणाला हानी पोहचविणे हा गुन्हा असून याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंदविला जात होता. मात्र, याबाबत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५ मधील कलम २ (ग) व ३ अन्वये गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशाप्रकारे विनापरवानगी वृक्षतोड/ वृक्षछाटणी करणाऱ्यांवर नियमानुसार दखलपात्र गुन्हे नोंद करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्याविषयी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे.

संबंधित विभाग कार्यालय क्षेत्रातील उद्यान अधिक्षकांमार्फत हे दखलपात्र गुन्हे दाखल करणे आणि या नोंदीत गुन्ह्यांसंदर्भात न्यायालयीन प्रकरणांबाबत महानगरपालिकेचा विधी विभाग आणि तालिका वकील यांच्याशी समन्वय ठेवून प्रकरणांचा निपटारा करण्याची जबाबदारी  परिमंडळ १ आणि २ च्या प्रभारी उद्यान अधिकारी यांचेवर सोपविण्यात आलेली आहे.


हेही वाचा -

मुंबईतील ४३ हजार इमारती टाळेबंदीतून मुक्त

मध्य व पश्चिम मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या