COVID 19च्या सद्यस्थितीत, व्यक्ती आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना त्यांच्या मोठ्या आकाराच्या आवश्यक आणि इतर वस्तूंची वाहतूक करणं कठीण जात आहे. बरेच जण पार्सल पाठवण्यासाठी स्पीड पोस्टची सेवा मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. यासाठी आणखी एक पर्याय म्हणजे टपाल रेल्वे पार्सल सेवा.
काही महिन्यांपूर्वी टपाल रेल्वे पार्सल सेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चांगला प्रतिसाद पाहता आता ही सेवा आणखी काही ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
भारतीय टपाल सेवा ग्राहकांकडून वस्तू घेईल आणि मध्य रेल्वे आणि टपाल मेल मोटर सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या खास पार्सल रेल्वेगाडय़ांच्या माध्यमातून गंतव्य स्थळी वस्तू पोहोचवेल. या सेवेद्वारे ग्राहकांना किफायतशीर दरानं घरपोच वस्तू मिळतील. दोन क्विंटल किंवा त्याहून अधिक वजनाच्या मालवाहतुकीसाठी ही सेवा किफायतशीर आहे. यामुळे पोस्टल सेवेच्या लॉजिस्टिक विभागात आणखी विविधता आणण्याचे संकेत मिळत आहेत.
भारतीय टपाल सेवा ग्राहकांच्या घरून वस्तू, पार्सल घेऊन रेल्वेच्या विशेष पार्सल गाड्यातून संबंधित शहरात पोहोचवणार. तिथून पुन्हा टपाल सेवा रेल्वे स्थानकावरून वस्तू, पार्सल घेणार आणि ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवणार.
ग्राहकांना ही सेवा किफायतशीर दरानं आणि डोअर-टू-डोअर वाहतुकिच्या सेवा सुविधेसह उपलब्ध करून दिली जाईल. ग्राहक adpsmailmah@gmail.com या मेल आयडीवर ईमेल करू शकतील, अशी माहिती रेल्वे विभाग आणि टपाल विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा