Advertisement

वांद्रे-वर्सोवा सी लिंक द्रुतगती महामार्गाला जोडा, मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सी लिंक आणि वर्सोवा-विरार सी लिंक या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच आढावा घेतला.

वांद्रे-वर्सोवा सी लिंक द्रुतगती महामार्गाला जोडा, मुख्यमंत्र्यांची सूचना
SHARES

मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सी लिंक आणि वर्सोवा-विरार सी लिंक या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी नुकताच आढावा घेतला. मुंबईतील वाहतूककोंडीवर मात करण्याच्या दृष्टीकोनातून हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीने वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत या दोन प्रकल्पांचे सादरीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर करण्यात आलं. वांद्रे-वर्सोवा हा सी लिंक हा ९.६ किमी असून या मार्गामुळे वाहतूककोंडी सुटून इंधनाची बचत होणार आहे. तसंच प्रवासाचा वेळ वाचणार आहे. हा सागरी महामार्ग सन २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. जुहू कोळीवाडा बाह्य मार्ग आणि वर्सोवा इथून पुढे हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

हेही वाचा- कळवा, मुंब्रा, दिवामध्ये तीव्र पाणी टंचाई

तर, वर्सोवा-विरार या सुमारे ४२.७५ किमी लांबीच्या सागरी मार्गाचा पूर्व सुसाध्यता अहवाल पूर्ण करण्यात आला आहे. वर्सोवा ते वसई आणि वसई ते विरार या दोन टप्प्यात या प्रकल्पाचं काम होणार आहे. मुंबईतील (mumbai) सागरी किनाऱ्याला समांतर असणाऱ्या या सागरी सेतूमुळे वर्सोवा ते विरार या मार्गावरील वाहतूक वेगवान होणार आहे. हा सागरी मार्ग बांधताना पर्यावरणविषयक सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला असून  मच्छिमारांच्या हालचालींना हानी पोचणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. चार ठिकाणी मच्छिमार नौका व इतर नौकांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी नेव्हिगेशन स्पॅन देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

वर्सोवा–विरार सागरी सेतू मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा. या दोन्ही सागरी सेतू मार्गामुळे या भागातील अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार असून रोजगार संधी वाढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सादरीकरण केलं. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) अनिलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

(maharashtra cm uddhav thackeray reviewed bandra versova sea link project work of mumbai)

हेही वाचा- परळच्या FS Ward ऑफिस मध्ये ठेवणार कोविशील्ड लसीचा डोस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा